लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : तालुक्यातील धुरखेडा शिवारातील एका शेतालगतच्या मोठ्या नाल्यात मासेमारी करीत असताना बिबट्याने हल्ला चढविला. त्यात मासेमारी करणारा जखमी झाला असून, तो थोडक्यात बचावला. ही घटना उमरेडपासून केवळ ४ किमी अंतरावरील धुरखेडा शिवारात साेमवारी (दि. १२) सकाळच्या सुमारास घडली.
नामदेव गंगाराम मांढरे (४७, रा. इतवारी पेठ, उमरेड) असे जखमीचे नाव आहे. नामदेव मांढरे नेहमीप्रमाणे साेमवारी सकाळच्या सुमारास उमरेड-मोहपा शिवारातील मोठ्या नाल्यालगत मासेमारी करण्यासाठी गेला होता. अशातच सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. नामदेवला काही समजण्याच्या आतच बिबट्याने त्याच्या हाताला चावा घेतला तर डोक्याला ओरबाडले. यात नामदेव जखमी झाला. लागलीच त्याने आरडाओरड केली. जखमी अवस्थेत लगतच्याच शेतात असलेल्या शेतमजुरांकडे तो पळत सुटला आणि थोडक्यात बचावला.
दुसरीकडे बिबट्याने आपला मार्ग बदलविला. नामदेव मांढरे यांना उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूर मेडिकल रुग्णालयात रवाना करण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण-उमरेड परिक्षेत्रातील वन विभागाच्या चमूने ‘ऑन दी स्पॉट’ पाहणी करीत पंचनामा केला.