नागपूर : रामटेक तालुक्यातील पंचाळा शेतशिवारातील चित्रकुट वाॅटर पार्क जवळील टाॅवर लगतच्या शेतात करंट लागून बिबट्याचामृत्यू झाला आहे. ही घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
रामटेक खिंडसी रोडवरील पंचाळा शेतशिवारात बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी उघडकीस आली असून शनिवारी सकाळी वनविभागाने शवविच्छेदन करून व्हिसेरा वैद्यकीय परीक्षणासाठी पाठविला आहे. हा बिबट अंदाजे ४ वर्षाचा असून त्याचा मृत्यू दोन-तीन दिवसांआधी झाला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला.
या परिसरातील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांपासून पिकाच्या संरक्षणासाठी शेतातील कुंपणावर विद्युत प्रवाहित तारा लावून ठेवल्या. या विद्युत तारांचा स्पर्श होऊन या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी, शेतमालक नंदू शिवरकर (वय ३२) याला ताब्यात घेण्यात आले असून विचारपूस केली असता त्याने वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांच्या सुरक्षेसाठी ही व्यवस्था केल्याचे सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या परिसरात बिबट्याची जोडी दिसून आली होती. त्यामुळे, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.