कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील सिंदी शिवारात १३ फेब्रुवारी रोजी अंदाजे १ वर्ष वयाचा बिबट मृतावस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू उपासमारीमुळे झाला असल्याचे समोर आले आहे. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान कळमेश्वर पोलीस स्टेशन येथील परवेझ शेख यांनी भ्रमणध्वनीवरून मौजा भडांगी येथील शेतशिवारात वन्यप्राणी बिबट मृतावस्थेत आढळून आल्याबाबत वन विभागाला कळविले. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोकास्थळी पोहोचून पाहणी केली असता शेत सर्व्हे क्रमांक १०५/१ अ(मौजा सिंदी)मध्ये धुऱ्यावर अंदाजे १ वर्ष वयाचा बिबट मृतावस्थेत आढळून आला. आजूबाजूला पाहणी केली असता कुठेही विजेचे तार, फासे लावलेले किंवा विषप्रयोग केल्याचे पुरावे आढळून आले नाहीत. शवाची पाहणी केली असता प्राथमिकता न कळता हा बिबट आईपासून वेगळे झाले नि शिकार करण्याची कला अवगत न झाल्याने उपासमारीमुळे मृत पावल्याचे दिसून आले. बरेच वेळा आई शिकारीस गेली असता पिल्लांना एका सुरक्षित ठिकाणी लपवून त्यांच्यासाठी अन्न आणण्यास निघून जाते. कुतूहलापोटी पिल्ले बाहेर पडतात. इतरत्र भटकत ती परत आपल्या सुरक्षित जागी पोहोचण्यास अयशस्वी झाल्यास याप्रकारे अन्नपाण्याविना मृत्युमुखी पडतात. मृत बिबट्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घनबहादूर, डॉ. बिलाल यांनी केले. सदर कार्यवाही सहायक वनसंरक्षक प्रज्योत पालवे, काटोल यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अर्चना नौकरकर, क्षेत्र सहायक सुनील फुलझेले, वनरक्षक जी.आर. मानकर, वनमजूर बोरकर, विष्णू बन्सोड, निरंजन नागपुरे, वाहन चालक श्रावण नागपुरे, मंगेश पांडे आणि लिपिक पहाडे यांनी केली.
बिबट्याचा उपासमारीने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:11 AM