लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिकार केल्यानंतर वाघ, बिबट्या पुन्हा त्या जागेवर येतो, असा जंगलातील अनुुभव असला तरी नागपुरातील महाराजबागेजवळ पोहोचलेला बिबट्या शिकारीनंतर पुन्हा फिरकलाच नाही. त्याला कॅमेरा ट्रॅपमध्ये आणि पिंजऱ्यात कैद करण्यासाठी वनविभागाने बरेच परिश्रम घेतले होते. मात्र बिबट्याने पुन्हा एकदा हुलकावणी दिली. तब्बल ६ दिवसांपासून त्याच्या सुरू असलेल्या शोधानंतरही तो हाती न लागल्याने वनखात्याची झोप पार उडाली आहे.
डुकराची शिकार आढळलेल्या परिसरात तीन पिंजरे आणि कॅमेरे मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले होते. कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी मोठ्या उत्सुकतेने या पिंजऱ्यांची आणि सर्व कॅमेऱ्यांची पाहणी केली, मात्र निराशा पदरात पडली. बिबट्याचा कुठेच मागमूस लागत नसल्याने बुधवारी दुपारी वन अधिकाऱ्यांची दुपारनंतर गंभीर बैठक झाली. त्यानंतर पिंजऱ्यांची जागा बदलून ते अन्य ठिकाणी लावण्याचे ठरले. रात्रपाळीतील गस्तही वाढविण्यात आली आहे.
दरम्यान वनविभागाची तीन पथके बिबट्याच्या शोधासाठी फिरत आहेत. बुधवारी मोक्षधाम, बर्डी ते अंबाझरी हा नाल्याचा परिसर आणि लगतचा जंगली भाग असा २० ते २२ किलोमीटरचा परिसर या तीनही पथकांनी पिंजून काढला. श्वान स्टेफीही दिवसभर कामगिरीवर होती. मात्र यश आले नाही.
शिकारीकडे फिरकला नाही
मोगली गार्डनलगतच्या नाल्याजवळ बिबट्याने शिकार केली होती. तिथे दोन आणि महाराजबागेत एक असे तीन पिंजरे लावले होते. त्यात बकरी सोडली होती. मात्र बिबट्या फिरकला नाही. पिंजऱ्यातील बकरी मात्र रात्रभर ओरडत होती.
सात पिंजरे अन् २५ कॅमेरे
बुधवारी सायंकाळी परिसरात ७ पिंजरे लावण्यात आले आहेत. कॅमेऱ्यांची संख्याही वाढविली असून जागाही बदलली आहे. वनविभागाचे पथक आणि खुद्द अधिकारीही रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. पंजाबराव कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीलगत एक पिंजरा सायंकाळी लावण्यात आला.
बिबट्याचा कसून शोध सुरू आहे. बुधवारीही परिसरात शोधमोहीम राबविली होती. कॅमेरे आणि पिंजरे वाढविले आहेत. एका ठिकाणी दिसल्यावर दुसऱ्यांदा तो तिथे जात नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे शोधकार्यातील अडचण वाढली आहे.
भरतसिंग हाडा, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग