पारशिवनी : तालुक्यातील साेनेगाव, हिंगणा, डाेरली, तामसवाडी परिसरात बिबट्याची चांगलीच दहशत पसरली आहे. अशातच शेतातील गाेठ्यात बांधून असलेल्या बकरीचा बिबट्याने फडशा पाडला. ही घटना साेनेगाव शिवारात मंगळवारी (दि. १४) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
गणपत मेश्राम यांची साेनेगाव शिवारात शेती असून, साेमवारी (दि. १३) सायंकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे शेतातील गाेठ्यात आपली जनावरे बांधून ठेवली हाेती. दरम्यान, बिबट्याने गाेठ्यातील बकरीवर हल्ला चढवून तिला ठार केले. बिबट्याने बकरीला ओढत नेऊन परिसरात फस्त केले. मंगळवारी सकाळी गणपत मेश्राम शेतात गेले असता, बिबट्याने बकरी ठार केल्याचे आढळून आले. याबाबत पारशिवनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सूचना देण्यात आली. या घटनेमुळे मेश्राम यांचे अंदाजे १० हजारांचे नुकसान झाले. वनविभागाने त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.