लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : पेंच राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या भुलेवाडी (ता. पारशिवनी) परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने शनिवारी (दि. २४) पहाटे गावातील घरालगत असलेल्या गाेठ्यात शिरून बाेकडाची शिकार केल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
या भागात मागील काही दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. घनश्याम धनराज ढगे, रा. भुलेवाडी, ता. पारशिवनी ते शनिवारी सकाळी त्यांच्या घराशेजारी असलेल्या गाेठ्यात जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेले असता, त्यांना गाेठ्यात एक बाेकड कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी इतरांना माहिती देत त्याचा शाेध घ्यायला सुरुवात केली. त्यांना हा बाेकड गाेठ्यापासून काही अंतरावर अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला.
परिणामी, त्यांनी वन कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला. तिथे आढळून आलेल्या पाऊलखुणांवरून बाेकडाची शिकार बिबट्याने केल्याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी दिली. बिबट्याने गाेठ्यात शिरून बाेकडाची शिकार केली आणि त्याला फरफटत बाहेर आणल्याचेही स्पष्ट झाले. त्या बाेकडाची किंमत १५ हजार रुपये असल्याची माहिती घनश्याम ढगे यांनी दिली असून, वन विभागाने याेग्य नुकसान भरपाई द्यावी तसेच या बिबट्याचा कायमचा बंदाेबस्त करावा, अशी मागणीही त्यांच्यासह नागरिकांनी केली आहे.