नागपूर : हिंगणा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात वावरत असलेला बिबट्या आता सोमवारी सायंकाळी अंबाझरी जैवविविधता उद्यानाकडे परतला आहे. सोमवारी सायंकाळी या बिबट्याची छायाचित्रे कॅमेरा ट्रॅपमध्ये आली. यावरून हा अंदाज लावला जात आहे.
यापूर्वी हा बिबट्या ९ जुलैला नागलवाडी गावाजवळ दिसला होता. नंतर बुधवारी १४ जुलैच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास ऑर्डनन्स फॅक्टरी परिसराच्या १० आणि ११ क्रमांकाच्या चौकीजवळ ड्यूटीवर असलेल्या डीएससी जवान भजन सिंह यांना दिसला होता. तर, गुरुवारच्या पहाटे ३ वाजता कार्यवेक्षक पी. एल. पोटभरे यांना ९ क्रमांकाच्या चौकीलगत दिसला होता. गुरुवारी दिवसभर त्याचा या परिसरात शोध घेण्यात आला; मात्र तो सापडला नव्हता. घटनास्थळी आढळलेल्या पगमार्कच्या अभ्यासावरून तो अंबाझरी जैवविविधता उद्यानातील असल्याचे लक्षात आले होते. १८ जुलैच्या रात्री १० वाजेच्या दरम्यान बिबट्या अमरावती रोडवरील कोठारी ले-आउट आणि काचीमेटच्या जवळपास असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे वन विभागाच्या पथकाने रात्री त्याचा शोध घेतला; मात्र तो दिसला नाही. सोमवारी सायंकाळच्या कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रांवरून तो अंबाझरी जैवविविधता उद्यानाकडे गेला असल्याची माहिती वन विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
...
युनिव्हर्सिटी कॅम्पस परिसरात असल्याची चर्चा
सोमवारी विद्यापीठ कॅम्पसलगतच्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये बिबट्या लपून असल्याची वार्ता मोठ्या प्रमाणात पसरली होती. वन विभागाच्या पथकाने दुपारी अडीच वाजेपर्यंत या परिसरात शोधमोहीम राबविली. मात्र, त्याचा वावर असल्याची कसलीही चिन्हे दिसली नाहीत. पगमार्कही आढळले नाही. आरएफओ आशिष निनावे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, शहरात दिवसभर ही चर्चा जोरात होती.
...