लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आठवडाभरापासून शहरात वावरत असलेला बिबट्या आता जुन्या हायकोर्ट परिसर व आयुक्त कार्यालय परिसरात पोहोचला आहे. काही नागरिकांनी या भागात बिबट दिसले त्याचे सांगितल्यावर वन विभागाच्या पथकाकडून आज सकाळी या परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली वनविभागाच्या श्वानपथकातील स्टेफीनेसुद्धा बिबट्या या परिसरात आल्याचा माग काढला आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी बुधवारी महाराजबाग परिसर, पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय परिसर आणि लगतच्या नाल्याच्या काठावर असे एकूण सात पिंजरे लावले होते. परंतु त्या परिसराऐवजी आज तो नवीनच भागात पोहोचला. हा परिसर शासकीय कार्यालयांचा असून अनेक शासकीय इमारती या ठिकाणी आहेत. लागूनच नाला सुद्धा आहे. या मार्गानेच तो या परिसरात पोहोचला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. अगदी मध्यवस्तीत बिबट्या वावरत असल्याने वनविभागाचा ताण बराच वाढला आहे.