लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शेतातील गाेठ्यातील गुरांवर हल्ला चढवून बिबट्याने एका कालवडीची शिकार केली. ही घटना तालुक्यातील मानेगाव शिवारात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गाेठ्यातील इतर जनावरे बचावली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
विनायक गुंडेराव घ्यार रा. माळेगाव, ता. सावनेर यांची प.ह.नं. ३२ मध्ये शेत सर्व्हे नं. ५९ ही शेती असून, त्यांच्या शेतातच जनावरांचा गाेठा आहे. मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी शेतातील गाेठ्यात बैलजाेडी, एक गाय व कालवड अशी चार जनावरे बांधून ठेवली. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गाेठ्यातील जनावरांवर हल्ला चढविला. त्यात बिबट्याने कालवडीचा फडशा पाडला. बुधवारी सकाळच्या सुमारास शेतकरी घ्यार हे शेतात आले असता, त्यांना कालवड मृतावस्थेत आढळून आली. याबाबत वन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच खापा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक, क्षेत्र सहायक जी. एच. राठाेड, वनरक्षक ए. डी. काकडे, वन मजूर चिंतामण झाडे आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शेतशिवारात बिबट्याचा वावर लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपली जनावरे शेतात न ठेवता घरी घेऊन जावीत, असे आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास वनविभागाने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.