आलाप संगीत विद्यालयाचा वर्धापनदिन : विद्यार्थ्यांचे सुरेल सादरीकरण नागपूर : संगीत प्रेमींना शास्त्रीय संगीत - गायन, वादनाचे यथोचित मार्गदर्शन करणाऱ्या पूर्व नागपुरातील नवीन सुभेदार लेआऊट स्थित आलाप संगीत विद्यालयाचा पंधरावा वर्धापन दिन नुकताच आयोजित करण्यात आला. रघुजीनगर येथील कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. संस्थेच्या संचालिका अंजली निसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार, संस्कार भारतीचे महामंत्री आशुतोष अडोणी, संस्थेचे अध्यक्ष श्याम निसाळ यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रारंभी सरस्वती वंदना सादर करून दिवंगत संगीत साधक पं. प्रभाकर देशकर, सतारवादक विजया रिसालदार, पं. सीताराम लोखंडे व सुमती निसळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डॉ. पीयूषकुमार यांनी विद्यालयाच्या प्रगतीबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. आशुतोष अडोणी यांनी जीवन संगीताचा आनंद जनमानसात निरलसपणे वितरित करणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांप्रती समाधान व्यक्त केले. लोकसंगीतासह शास्त्रीय रागसंगीताच्या या कार्यक्रमाचा प्रारंभ राग हिरभैरवमधील ‘आज मिल सब मंगल गाओ...’ बंदिशीसह सुरेल वाद्य सहसंगतीसह सादर करण्यात आला. यानंतर हंसध्वनी रागातील सरगम व बालगायकांनी सादर केलेल्या तिलक कामोद रागातील सरगमने रसिकांची दाद घेतली. मराठमोळ्या संस्कृतीचा गंध लाभलेल्या ‘उजळून आलं आभाळ, आम्ही ठाकरं ठाकरं.., धनगर राजा आदी गीतांचे आनंददायी सादरीकरण करण्यात आले. ‘अग नाच नाच राधे..., आई उदे ग उदे...,’ आदी गीतांवर यावेळी नृत्य सादर करण्यात आले. विठू माऊली तू माऊली जगाची...या गीताने हा कार्यक्रम संपला. प्रास्ताविक प्राची भट हिने केले. कार्यक्रमाचे निवेदन संगीता तांबोळी यांनी केले. शिरीष भालेराव, गोविंद गडीकर, अंजली निसाळ, मनोज घुसे, सुभाष वानखेडे, पंकज यादव या कलावंतांनी सहवादन केले. मनोज घुसे, सुनीता घोंगे, भावना इंगोले, मनीषा देशकर, रेणुका खोंड यांनी संयोजनासाठी सहकार्य केले. प्रमुख अतिथींचा सत्कार अंजली व श्याम निसाळ यांनी केला. याप्रसंगी डॉ. रूपाताई कुळकर्णी, डॉ. किशोरी निसळ, राजाभाऊ चिटणवीस, श्रीकांत गडकरी, नंदु अंधारे, मधुरिका गडकरी यांचे स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)
जल्लोष स्वरतालाचा निनाद आलापचा
By admin | Published: August 01, 2014 1:13 AM