फोटो आहे....
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत १८ दिवसांनंतर पुन्हा वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या दरवाढीने पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या संख्येत घसरण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल व डिझेलच्या विक्रीत पूर्वीच्या तुलनेत दररोज ६० टक्के घसरण दिसून येत आहे, तर शनिवार व रविवारी विक्री ३० टक्केच असते.
जिल्हाबंदी, कठोर निर्बंध आणि नागरिकांना ये-जा करण्यास मनाई असल्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर झाला आहे, याशिवाय अनेक जण घरूनच काम करीत असल्याने इंधन विक्री कमी झाली आहे. याशिवाय परिस्थिती अशीच राहिल्यास पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही रोजगाराची चिंता सतावत आहे. मार्च, २०२० पासून पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत घसरण दिसून येत आहे.
कर्मचाऱ्यांचे व्हावे लसीकरण
पंपावर काम करणारे कर्मचारी फ्रंटलाइन वर्कर असल्याचे सांगून विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने लसीकरणात प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता म्हणाले, पंपावर अनेक लोक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येतात. अनेक वाहनचालक मास्क घालत नाहीत. यामुळे महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्या अँटिजन टेस्टची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. त्यानंतर, नागपुरातील पंपावरील ३५ कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते.