कळमेश्वर : मागेल त्याला काम या तत्त्वानुसार राज्यात १९७७ साली रोजगार हमी योजनेला सुरुवात झाली. केंद्र सरकारने २००५मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कायदा लागू केला. या योजनेत प्रत्येक कुटुंबाला १०० दिवस रोजगाराची हमी दिली जाते. मात्र मागच्या दोन वर्षांपासून शंभर दिवसांपेक्षा कमी काम मिळत असल्याने ग्रामीण भागात नाराजी व्यक्त केली जात आहे.
लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. स्थानिक सर्व व्यवसाय बंद असल्याने ग्रामीण भागात मजुरांचे हाल झाले. अशांना रोजगार हमीच्या कामाची आवश्यकता आहे.
ग्रामीण श्रमिक वर्गाला मग्रारोहयोचाच आधार असल्याचे वारंवार सिद्ध होत असताना प्रशासकीय पातळीवर मात्र या योजनेची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येते. कळमेश्वर तालुक्यात हीच अवस्था आहे. लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली मनरेगाची कामे गतवर्षी २० एप्रिलला सुरू करण्याचे निर्देश केंद्राने दिल्यानंतर काही प्रमाणात ग्रामीण भागात मजुरांना काम मिळाले होते. दरवर्षी १५ ऑगस्टला ग्रामसभेत कामे मंजूर झाल्यानंतर पुढील काही महिन्यांत कामाला सुरुवात होते. शेतीची कामे उन्हाळ्यात कमी होत असल्याने रोहयोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होतात. सध्या ग्रामीण भागात तुरळक कामे चाललेली आहेत.