सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे पाच दिवस उलटून गेले असताना, ‘कोविशिल्ड’च्या तुलनेत ‘कोव्हॅक्सीन’ला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ५६३ पैकी २१४ लाभार्थ्यांनीच ‘कोव्हॅक्सीन’ घेतली आहे. विशेष म्हणजे, कोविशिल्ड लसीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत, तर कोव्हॅक्सीन लसीचा तिसरा टप्पा अद्यापही सुरू आहे. यातच कोव्हॅक्सीन लस देताना लाभार्थ्याची मंजुरी घेतली जात आहे. याचा परिणाम लसीकरणावर होत असल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर ज्या प्रतिबंधक लसीची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता, त्याचा शुभारंभ १६ जानेवारीपासून सुरू झाला. यासाठी सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ लसीचे ४२ हजार डोस, तर भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ लसीचे २ हजार डोस मिळाले. नागपूर जिल्ह्यात शहरातील पाच, तर ग्रामीणमध्ये सात असे एकूण १२ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यातील केवळ मेडिकल केंद्रावर ‘कोव्हॅक्सीन’ तर इतर ११ केंद्रांवर कोवीशील्ड लस दिली जात आहे. मेडिकलमध्ये पहिल्या दिवशी १०० पैकी ५३, दुसऱ्या दिवशी १०० पैकी २९, तिसऱ्या दिवशी १०० पैकी ५२, चौथ्या दिवशी १०० पैकी २१, तर पाचव्या दिवशी १५० पैकी ५९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्या तुलनेत शहरातील इतर चार केंद्रांवर ‘कोविशिल्ड’ लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- २६९७ पैकी १५२९ लाभार्थ्यांनी घेतली लस
शहरातील पाच केंद्रांवर २६९७ पैकी १५२९ लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. यात मेडिकल केंद्रावर ५६३ पैकी २१४, पाचपावली केंद्रावर ५८४ पैकी ३६७, एम्स केंद्रावर ५५० पैकी ४११, डागा केंद्रावर ५०० पैकी २२९, तर मेयो केंद्रावर ५०० पैकी ३०८ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे.
- पाच दिवसांतील लसीकरणाची स्थिती
मेडिकल २१४ ५६३ (कोव्हॅक्सीन)
पाचपावली ३६७ ५८४ (कोविशिल्ड)
एम्स ४११ ५५० (कोविशिल्ड)
डागा २२९ ५०० (कोविशिल्ड)
मेयो ३०८ ५०० (कोविशील्ड)
- ‘कोव्हॅक्सीन’ची ट्रायल सुरू असल्याने दिला नकार
‘कोव्हॅक्सीन’चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी (ट्रायल) अद्यापही सुरू आहे. असे असताना लाभार्थ्यांची मंजुरी घेऊन ती लस दिली जात आहे. यामुळे मनामध्ये एक प्रकारची भीती आहे. यामुळे तूर्तास लसीकरणाला नकार दिला आहे.
- एक डॉक्टर, मेडिकल
- कोव्हॅक्सीन सुरक्षित लस
गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जुलै महिन्यापासून कोव्हॅक्सीनच्या पहिल्या टप्प्याच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली. यात ५० स्वयंसेवकांना, तर दुसऱ्या टप्प्यात ५५ स्वयंसेवकांना लस देण्यात आली. मागील पाच महिन्यात यातील एकालाही गंभीर स्वरूपाची ‘रिअॅक्शन’ दिसून आलेली नाही. शिवाय, नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये १६८० स्वयंसेवकांवर लसीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला आहे. या सर्वांची प्रकृती उत्तम आहे. यावरूनच ‘कोव्हॅक्सीन’ लस सुरक्षित आहे. न घाबरता ही लस घ्यायला हवी.
- डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर
संचालक, गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल