नागपूर : दक्षिण नागपुरातील नगरसेवकांना त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे ९० टक्के गुण देता येतील. मात्र दक्षिण -पश्चिम मतदारसंघातील कामे पाहता माजी नगरसेवकांना १०० पैकी ५० टक्केपेक्षा कमी गुण द्यावे लागतील, असे खडेबोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुनावले. दक्षिण पश्चिम मतदारसंघात शनिवारी कृषी विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
साहित्य वाटप कार्यक्रमाला किमान १० हजार गरजू उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. मात्र माजी नगरसेवक कमी पडले. अशी नाराजी गडकरी यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वितरण शिबिरामध्ये गडकरी व फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात १० लाभार्थ्यांना उपकरणे प्रदान करण्यात आली. दक्षिण पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील ३९५० लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. प्रास्ताविकात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपाद्वारे वितरित केलेल्या साहित्याची माहिती दिली.
आमदार प्रवीण दटके, मोहन मते, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, डॉ. परिणय फुके, खादी आयोगाचे संचालक जयप्रकाश गुप्ता, आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर, नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, राम जोशी, माजी आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, नाना शामकुळे, कार्यक्रमाचे संयोजक नरेंद्र बोरकर, सुधीर दिवे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
नागपुरात बोन मॅरो ट्रान्सप्लांटची व्यवस्था
पूर्व विदर्भ आणि उत्तर नागपूर या भागामध्ये सिकलसेल थैलसिमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. या रुग्णावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा महत्वाचा उपचार आहे. त्यासाठी नागपुराबाहेर जावे लागते. याचा विचार करता नागपुरात बोन मॅरो ट्रान्सप्लांटची व्यवस्था केली जाईल, अशी घोषणा नितीन गडकरी यांनी केली.गरजुपर्यंत लाभ पोहोचविण्यास कटिबद्ध : फडणवीस
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन् नितीन गडकरी यांनी नागपुरात घेतलेला पुढाकार ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. नागपूर शहरातील प्रत्येक दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिक या योजनेपासून लाभान्वीत व्हावा, यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.