नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)च्या आठवीच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना समाजसेवक डाॅ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसाविषयी शिकायला मिळणार आहे. सीबीएसईने ‘हेमलकसा - मूक प्राण्यांचे अनाथालय’ हा धडा समाविष्ट केला आहे.
हा धडा ‘लाेकमत’चे ज्येष्ठ पत्रकार फहीम खान यांनी लिहिला आहे. सीबीएसईने या शैक्षणिक सत्रापासून वर्ग आठवीच्या मराठी विषयासाठी ‘शिवाई’ पुस्तकाची निवड केली आहे. या पुस्तकात हा धडा समाविष्ट करण्यात आला आहे. या धड्याच्या माध्यमातून डाॅ. प्रकाश आमटे यांनी गडचिराेली जिल्ह्याच्या हेमलकसा येथे मूक प्राण्यांसाठी चालविलेल्या कार्याची ओळख हाेणार आहे. त्यांनी उभारलेल्या प्राण्यांच्या अनाथालयाची विस्तृत माहिती यामध्ये दिली आहे. या धड्याच्या माध्यमातून नागपुरातून हेमलकसाला कसे पाेहोचायचे, याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे.