लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे लवकरच संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योगांना आवश्यक असलेल्या कौशल्यगुणांवर आधारित अभ्यासक्रम सुरू होणार आहे. ‘डिफेन्स स्टडीज’ असा हा अभ्यासक्रम राहणार असून, संरक्षण उद्योगाला लागणारे मनुष्यबळ यातून पुरविण्याचा प्रयत्न होईल. लवकरच या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
संरक्षण क्षेत्रात नागपूरचे नाव महत्त्वाचे असून, येथील संरक्षण क्षेत्राशी निगडित उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासते. ही बाब लक्षात ठेवून हा अभ्यासक्रम नियोजित करण्यात आला आहे, याशिवाय कला आणि विज्ञान शाखांचे आंतरशाखीय अभ्यासक्रमही राबविले जाणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना आमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी दिली.
‘आयटी’ कंपनीच्या मदतीने अभ्यासक्रम
नागपुरात ‘आयटी’ कंपन्यांचाही विस्तार होत आहे. विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनादेखील तेथे जाण्याची संधी मिळावी, यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. ‘टीसीएस’, ‘आयबीएम’ यासारख्या मोठ्या ‘आयटी’ कंपन्यांच्या मदतीने कौशल्यविकास अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील व ते विद्यापीठ परिसरात चालविले जातील. उद्योगांच्या मागणीनुसारच हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील.