लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : जलभूमी फाऊंडेशनच्या वतीने ‘एक पाऊल उद्याेगाकडे’अंतर्गत गाथा गांडूळ खताची विषयावर महिलांना गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण दिले जात आहे. उमेदच्या माध्यमातून उमठा (ता. नरखेड) येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यात रिता गायकवाड यांनी महिलांना गांडूळ खत निर्मितीचे धडे गिरविले. या प्रशिक्षणाला दावसा येथील स्वयंसहायता बचत गटातील २५ महिलांनी सहभाग घेतला हाेता.
एक दिवसीय प्रशिक्षणात प्रात्यक्षिकासह गांडूळ खत शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करायचे. त्याला शासकीय याेजनेची जाेड कशी मिळवायची तसेच शेतकरी आपली शेती आधुनिक पद्धतीने कशी व काेणत्या पद्धतीने करतील, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. साेबतच देशी गाईच्या शेणापासून दिवे, गाेवऱ्या, धूपबत्ती कसे तयार करावे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले. शेतकरी सेंद्रिय शेती करून रासायनिक पद्धतीमुळे शेतीचा आणि आर्थिक बाबींचा हाेणारा ऱ्हास कमी व्हावा. महिलांना शेतीपूरक व्यवसाय व भूमिहीन व्यक्तीच्या हाताला काम मिळून स्वत:चा व्यवसाय सुरू करतील. घरधन्याच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मदत हाेईल, हे या चळवळीच्या माध्यमातून पटवून दिले जात आहे. या उपक्रमाप्रसंगी जलभूमी फाऊंडेशनचे सचिव नीलेश ठाकरे, उपाध्यक्ष सागर चाैधरी, विजय निंबुरकार तसेच शांतीगंगा फाॅमर्स प्राेड्युसर कंपनीचे संचालक सूरज निंबुरकार यांच्यासह इतर सहकारी उपस्थित हाेते.