लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागपुरात रुग्णसंख्या दोन हजारापर्यंत पोहोचली आहे. आपल्याला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील महिन्यात २२ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. मात्र कोरोनाच्या संकटात दरवर्षीप्रमाणे आपल्याला हा उत्सव साजरा करायचा नाही. गणेशोत्सवासंबंधी लवकरच राज्य शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र आपण सर्वांनी दक्षता घेऊन यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून करू या, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.मनपातर्फे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीनिमित्त करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात मंगळवारी संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, प्रतोद दिव्या धुरडे, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, झोन सभापती लता काडगाये, समिता चकोले, वंदना येंगटवार, अभिरुची राजगिरे, गार्गी चोपरा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.गणेशोत्सवासंबंधी येत्या २० जुलैपर्यंत महाराष्ट्र शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र कोविडची सध्याची स्थिती पाहता शहरवासीयांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शक्यतो सार्वजनिक गणेशोत्सव टाळावे. या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्योत्सव साजरा करण्यात यावेत. जनजागृती करणारे, आरोग्याबाबत दक्ष करणारे कार्यक्रम घेण्यात यावेत, असेही त्यांनी सांगितले.खबरदारी महत्त्वाचीराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणेच शहरातही कोणत्याही गणेशमूर्ती चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात. उत्सव साजरा करताना ५० लोकांपेक्षा जास्त जणांची उपस्थिती नसावी. सर्व ठिकाणी फि जिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, सर्वांनी मास्क लावावे, हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करावा. विशेष म्हणजे, श्री गणेशाची स्थापना करताना किंवा विसर्जन करतानाच्या मिरवणुका टाळाव्यात, गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करायचे आहे, असे आवाहन संदीप जोशी यांनी केले आहे.