वर्षा बाशूलोकमत न्यूज नेटवर्क:नागपूर:
पुण्याच्या प्रमोद व अनिता तांबे या दांपत्याने या मातीविरहित बागेची सुरुवात एकदीड वर्षांपूर्वी पुण्यात केली. स्वयंपाकघरातील कचºयामधल्या विघटनशील पदार्थांपासून कंपोस्ट खत तयार करण्याचे तंत्र त्यांनी त्यासाठी वापरले. पाहता पाहता ती संकल्पना विस्तारत गेली. त्यांनी सुरु केलेल्या फेसबुक पेजचे आज लाखो फॉलोअर्स आहेत. या फेसबुकपेजवरील माहिती वाचून नागपुरात त्रिमूर्तीनगर भागात राहणाºया उमेश चित्रिव यांनी आपल्या घरी कंपोस्ट खताचा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वी झाला.दरम्यान तांबे दांपत्याने सुरू केलेल्या वॉट््सअप ग्रूपचा विस्तारही महाराष्ट्रात काही हजारांच्या घरात गेला होता. त्याच्या मर्यादा लक्षात घेता उमेश चित्रिव यांनी नागपुरात १८ जानेवारी २०१८ पासून गच्चीवरील मातीविरहित बाग हा नवा ग्रूप सुरू करून कामाला सुरुवात केली. आजमितीस या ग्रूपमध्ये साडेतीनशेहून अधिक सदस्य आहेत आणि किमान १०० जणांच्या घरी फुललेली अशी मातीविरहित बाग गच्चीवर किंवा गॅलरीत आपल्याला पहावयास मिळू शकते.काय आहे मातीविरहित बागेची संकल्पना?आपण बाजारातून रोपटे आणून कुंडीत माती भरून लावतो. तसे न करता, आणलेल्या रोपट्याच्या मुळांना लपेटण्यासाठी जेवढी माती लावली असेल तेवढीच कायम ठेवून बाकी घरात तयार केलेल्या कंपोस्ट खताने कुंडी भरून काढायची. हे खत कालांतराने खाली बसत जाते. वर रिकामी झालेली जागा पुन्हा खत टाकूनच भरून काढायची. या रोपट्याला पाणी एरव्ही देतो तसेच द्यायचे. फक्त ते थोडेसेच न देता, कुंडीच्या खालून ते बाहेर निघत आहे याची खात्री होईपर्यंत द्यायचे. याचे कारण असे की, पाणी जर साचून राहिले तर मुळं सडून रोपटे नष्ट होईल.कंपोस्ट खत कसे तयार कराल?चिरलेल्या पालेभाज्यांचे देठ, भाज्यांची व फळांची साले, कागदाचे तुकडे, खोबरं काढून झाल्यानंतर उरलेल्या नारळाचे सर्व भाग असे सर्व प्रकारचे विघटनशील पदार्थ छिद्र केलेल्या माठात किंवा पिंपात टाकत रहायचे. त्यावर झाकण ठेवायचे. या माठाला खाली व बाजूला छिद्रे करावीत. त्यामुळे कचºयातील पाणी निघून जाईल व कचरा कोरडा राहील. त्याचे कंपोस्ट खत होण्यासाठी सुरुवातीला बायोकल्चरचा वापर करणे आवश्यक ठरते. बायोकल्चर म्हणजे एक प्रकारचे विरजण असते. त्यामुळे खत निर्मितीची प्रक्रिया वेगाने सुरू होते. एकदा खत तयार झाले की तेच बायोकल्चरचे काम करते. साधारण दर आठ दिवसांनी माठात ठेवलेला हा कचरा वर खाली करायचा. पूर्णपणे कंपोस्ट खत तयार व्हायला अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. उन्हाळ््यात ही प्रक्रिया जरा लवकर होते तर हिवाळा-पावसाळ््यात थोडा अधिक अवधी लागतो.कचरा साठवायचा म्हटला की दुर्गंधी, डास, चिलटे, मुंग्या असे प्रश्न उभे होऊ शकतात. पण हा माठ घराच्या बाहेर गच्चीत वा गॅलरीत ठेवल्यास त्याचा त्रास होत नाही. मुख्य म्हणजे त्यातील पाण्याचा अंश निघून गेल्याने तो पूर्णपणे कोरडा होतो व त्याला अजिबात दुर्गंधी येत नाही. चहाच्या पावडरप्रमाणे हे कंपोस्ट खत दिसू लागते.उमेश चित्रिव यांना या उपक्रमात माधवी चौधरी, भाग्यश्री कापकर, विनय पटवर्धन, रितु जयस्वाल आदींचा मोठा सहभाग लाभतो आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आहे. या ग्रूपने सर्व गणेश मंडळांना निर्माल्य फेकून न देता त्याचे कंपोस्ट खत बनवण्याचे वा या ग्रूपला देण्याचे आवाहन केले आहे.