लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कायद्यापेक्षा कुणीच मोठा नाही. गुंडगिरी करणारे अन् अवैध धंद्यातून गब्बर झालेल्यांना त्यांची जागा दाखविण्यास पोलीस सज्ज आहेत, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी केले. परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त म्हणून नुकतेच नागपुरात रुजू झालेल्या नुरुल हसन यांनी मंगळवारी पत्रकारांशी औपचारिक चर्चा केली. २०१५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले हसन मूळचे उत्तर प्रदेशातील पिलीभित जवळच्या एका छोट्याशा खेडेगावातील रहिवासी आहेत. गरीब कुटुंबातील रहिवासी असलेल्या हसन यांनी बी.टेक. केल्यानंतर वैज्ञानिक म्हणून पालघरला काही वर्षे सेवा दिली. मात्र, अन्यायग्रस्तांना न्याय देऊन समाजकंटकांना धडा शिकविण्याची त्यांची मानिसकता असल्याने यूपीएससीच्या माध्यमातून ते आयपीएस बनले. बीडमध्ये प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना नांदेडमध्ये पहिली नियुक्ती देण्यात आली. बहुचर्चित धान्य घोटाळा हुडकून काढत हसन यांनी आपली कार्यशैली स्पष्ट केली. त्यानंतर ते यवतमाळला अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. कायदा आणि सुव्यवस्थेची घडी उत्तम राखत डिटेक्शनवर त्यांनी जोर देत यवतमाळला दीड वर्ष कर्तव्य बजावले. तेथेच ते पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार अशी मध्यंतरी चर्चा असताना त्यांची नागपुरात उपायुक्त म्हणून बदली झाली. त्यांनी नुकताच परिमंडळ-१चा पदभार सांभाळला आहे. सोनेगाव, प्रतापनगर, एमआयडीसी, हिंगणा, वाडी ही पोलीस ठाणी त्यांच्या कार्यक्षेत्रात येतात. या झोनमध्ये कबाड घेणारे, बुकी, भूमाफिया, सुपारी, प्रतिबंधित तंबाखूची तसेच रेती, गिट्टीची तस्करी करणाऱ्यांचा सुळसुळाट आहे. आपण त्यांची माहिती संकलित करीत असून, गुंड, अवैध धंदे करणारे आणि त्यांना संरक्षण देणारे या सर्वांना धडा शिकविण्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन करणार असल्याचे हसन यांनी पत्रकारांना सांगितले.
प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न
पोलिसांकडे येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भूमिका आहे. त्यानुसार प्रत्येक पीडिताला, गरजूंना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, असेही उपायुक्त हसन म्हणाले.