लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वधू-वर दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असतील, तर त्यांची अपत्येही 'थॅलेसेमियाग्रस्त' जन्मतात. त्यामुळे लग्नापूर्वी कुंडल्या पाहण्यासोबतच थॅलेसेमियाची तपासणी करा, जेणेकरून हा आजार पुढील पिढीत संक्रमित होणार नाही. तसेच सिकलसेलबाबतही आहे. यामुळे या आजाराविषयी जनजागृतीचे आंदोलन हाती घेऊ या, सिकलसेल व थॅलेसेमिया मुक्त भारत करू या, असे आवाहन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी येथे केले.थॅलेसेमिया व सिकलसेल सेंटर, जरीपटकाच्यावतीने बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी आवश्यक ‘एचएलए मॅचिंग’ शिबिराचे उद्घाटन गुरुवारी झाले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. मंचावर महापौर संदीप जोशी, मनपाचे आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, सेंटरचे संचालक डॉ.विंकी रुघवानी, प्रकाश मोटवानी, आय.पी. केशवानी व एच.आर. बाखरु उपस्थित होते.राज्यपाल पुरोहित म्हणाले, डॉ. विंकी रुघवानी हे निस्वार्थ भावनेने सिकलसेल व थॅलेसेमिया रुग्णांची सेवा करीत आहेत. सोबतच त्यांनी दोन्ही आजाराच्या जनजागृतीतून लोकांचे डोळे उघडण्याचे कामही हाती घेतले आहे. या जनजागृती आंदोलनात प्रत्येक जण सहभागी होणे आवश्यक आहे. असे झाल्यास, जसे आपण पोलिओ मुक्त भारत केले तसेच सिकलसेल व थॅलेसेमिया मुक्त भारत करता येईल. या दोन्ही आजाराच्या रुग्णांच्या मदतीसाठी प्रत्येकाने समोर येणेही आवश्यक आहे. जास्तीतजास्त थॅलेसेमिया व सिकलसेलच्या मुलांचे ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ कसे होईल याबाबत प्रयत्न व्हायला हवे, असेही ते म्हणाले.सिकलसेल व थॅलेसेमियाचा आजारावर प्रतिबंध घालता येऊ शकतो. यासाठी जनजागृतीची गरज आहे. महानगरपालिका यात पुढाकार घेईल, अशी ग्वाही महापौर जोशी यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक डॉ. रुघवानी यांनी केले. ते म्हणाले, सिकलसेल व थॅलेसेमिया या गंभीर आजारावर ‘बोन मॅरो प्रत्यारोपण’ हा स्थायी उपचार आहे. संबंधित रुग्णास त्याच्याशी जुळणारा स्टेमसेल दाता उपलब्ध झाल्यास त्याला नवे आयुष्य मिळू शकते. यासाठी रुग्णाचे भावंड,पालकांचे ‘एचएलए मॅचिंग’ करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया महागडी आहे. यामुळे नि:शुल्क शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या दोन्ही आजाराच्या जनजागृतीची मोहीम चालवायला हवी, असेही ते म्हणाले. संचालन अॅड. वैशाली बगाडे यांनी केले तर आभार दिगोंतो दास यांनी मानले. यावेळी तन्वी बगाडे, तेजस्विनी उमाळे, जस्टीन एक्का व अनिषा अतकर या मुलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सिकलसेल व थॅलेसेमिया मुक्त भारत करू या : राज्यपाल पुरोहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:36 PM
वधू-वर दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असतील, तर त्यांची अपत्येही 'थॅलेसेमियाग्रस्त' जन्मतात. त्यामुळे लग्नापूर्वी कुंडल्या पाहण्यासोबतच थॅलेसेमियाची तपासणी करा, जेणेकरून हा आजार पुढील पिढीत संक्रमित होणार नाही.
ठळक मुद्दे‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट एचएलए मॅचिंग’ शिबिराचे उद्घाटन