लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा चैत्यभूमीवर प्रत्यक्ष न जाता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे अनुयायांना आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे चैत्यभूमीच्या पत्त्यावर आतापर्यंत हजारो पत्रांचा पाऊस पडलाय. चैत्यभूमीवर हजारोपेक्षा जास्त तर दादर पोस्ट ऑफिस येथेही दररोज हजारो पत्रे येत आहेत.
महापरिनिर्वाणदिनानिमित्त दरवर्षी ६ डिसेंबर रोजी लाखोंच्या संख्येने अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर येतात. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. वर्षानुवर्षे या दिवशी न चुकता चैत्यभूमीवर जाणारे हजारो अनुयायी या वेळी कोरोनाच्या सावटामुळे मात्र जाऊ शकणार नाहीत. मात्र, अनुयायी आपल्या मनातील भावना अनोख्या पद्धतीने-पत्राद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचवत आहेत.
महाराष्ट्र आणि देशभरातून जे अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येऊ शकणार नाहीत अशांचे चैत्यभूमीच्या पत्त्यावर हजारोंच्या संख्येने पत्रे येत आहेत. या पत्रांपैकी अनेक पत्रे लहान मुलांनी लिहिली आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या भाषेतली पत्रे चैत्यभूमीच्या पत्त्यावर पाठवली जातायेत. उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगू अशा अनेक भाषांमधून ही पत्रे पाठवली जात आहेत.
बॉक्स
नागपुरातूनही दररोज हजारो पत्रे
नागपुरात समता सैनिक दलाचे प्रदीप गणवीर आणि तरुण सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कुत्तरमारे हे अभियान लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
त्यांनी सांगितले की, ज्यांना कोरोना महामारीच्या काळात चैत्यभूमी येथे येऊन आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करता येणे शक्य नाही, त्यांच्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बाबासाहेबांप्रति असलेल्या आपल्या कर्तव्य भावनेतून हा उपक्रम राबवत आहे. आपण फक्त एवढेच करायचे आहे. कुटुंबातील प्रत्येक एका व्यक्तीने आपल्या नावे "अभिवादन महामानवाला" हा संदेश आणि स्वतःचे नाव तसेच स्वतःचा पत्ता लिहून एक पोस्टकार्ड चैत्यभूमी_स्मारक_दादर_पश्चिम_मुंबई_४०००२८ या पत्त्यावर पाठवावे." कोरोनाचा प्रादुर्भाव आणि चैत्यभूमीवरची गर्दी टाळण्यासाठी अनुयायांनी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येऊ नये, त्याऐवजी अभिवादन करणारे पत्र पाठवावे असेही आवाहन प्रशासनाकडून केले जातेय. याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. नागपुरातूनही दररोज हजारो पोस्टकार्ड पाठवली जात आहेत. यातून डाक विभागालाही आर्थिक बळ मिळत आहे.