लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या नावाखाली महापालिका प्रशासन सत्तापक्षाला दबावात आणत असल्याचे दिसत आहे. नागरिकांशी निगडित प्रकरणांकडे खुलेआम कानाडोळा करण्यात येत आहे. परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकरसुद्धा प्रशासनासमोर हतबल झाल्याचे दिसत आहे. कायद्यानुसार स्थायी समितीसारखेच परिवहन समितीला संपूर्ण अधिकार आहेत. परंतु सोमवारी सभापतींच्या पत्राकडे आयबीटीएम ऑपरेटर डिम्टसने खुलेआमपणे कानाडोळा केला. सभापतींनी ६० बसेसचे संचालन करण्यासाठी पत्र जारी केले. डिम्टसने सायंकाळपर्यंत याबाबत काहीच निर्देश दिले नाहीत. याची माहिती मिळाल्यानंतर सभापती बोरकर यांनी डिम्टसच्या अधिकाऱ्यांना फटकारले. त्यानंतर १५ बसेसचे संचालन करण्यास परवानगी व मार्गाचे पत्र ऑपरेटरला जारी करण्यात आले. मंगळवारपासून शहरात एकूण १७२ आपली बस धावणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी सोमवारी डिम्टसला पत्र देऊन तीन्ही डिझेल बस ऑपरेटर द्वारा २०-२० बसेसचे संचालन मंगळवारपासून शहरात करण्याचे निर्देश दिले. सकाळी हे पत्र डिम्टसचे टीम लिडर अंबाडेकर यांना पाठविण्यात आले. परंतु सायंकाळपर्यंत बसेस सुरू करण्याबाबत डिम्टसने आदेश जारी केले नाहीत. सूत्रांनुसार, डिम्टसच्या मते ते सभापतींचे पत्र मान्य करू शकत नाहीत. प्रशासनाच्या वतीने त्यांना बस वाढविण्यासाठी पत्र देण्यात आलेले नाही. परंतु सायंकाळी सभापतींनी फटकारल्यानंतर ५-५ बसेच्या संचालनाबाबत तीनही बस ऑपरेटरला मार्ग जारी करण्यात आले. सध्या शहरात १५७ बसेसचे संचालन करण्यात येत आहे. प्रवासी वाढत असल्यामुळे अनेक मार्गांवर बसेसची सेवा सुरु करण्याची गरज आहे.
................
बसेस सुरू होणार
‘६० बसेस सुरु करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. लवकरच बसेस सुरु होणार आहेत. डिम्टसने मनमानी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करू.’
-बाल्या बोरकर, परिवहन समिती सभापती
............