नागपूर : उत्तर नागपूरसह ग्रामीण परिसर व मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील रुग्णांना उपचाराची सोय व्हावी, यासाठी इंदोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र या संस्थेचे श्रेणीवर्धन करुन येथे ६१५ खाटांच्या अतिविशेषोपचार रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली. परंतु प्रस्तावित श्रेणीवर्धनाच्या जागेवर अतिक्रमणाचे कारण देऊन हे रुग्णालयच आता मिहान येथे नेण्याचा घाट आहे. यासंदर्भातील एक पत्र शासनाला देण्यात आले.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत (डीएमईआर) १५ ऑगस्ट २००५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय सुरू झाले. तीन टप्प्यात या रुग्णालयाचा विकास होणार होता. मात्र, हे रुग्णालय आजही बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) पुरतेच मर्यादीत आहे. २०१९मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात आली. १० मार्च २०२२ रोजी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात या संस्थेच्या खर्चाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र या संस्थेचे श्रेणीवर्धन करुन येथे ६१५ खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय, ११ अतिविशेषोपचार व १७ विशेषोपचार अभ्यासक्रमास मान्यता मिळाली. श्रेणीवर्धनाकरिता आवश्यक असलेल्या जागेपैकी २८६२८ चौ. मीटर जागा श्रेणीवर्धनाकरिता उपलब्ध आहे. परंतु या जागेवर दोन ठिकाणी अतिक्रमण असल्याने ते काढण्याचे प्रयत्न न करताच हे रुग्णालय मिहानमध्ये नेण्यासाठी शासनाला पत्र देण्यात आले. यामुळे या रुग्णालयाचा मुख्य उद्देशच मागे पडण्याची शक्यता आहे.
- या अतिक्रमणाचे दिले कारण
रुग्णालयाच्या प्रस्तावित श्रेणीवर्धनाच्या जागेवर १५०० चौ. मीटर जागेवरील बांधकाम मधोमध येत असून, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तर, संस्थेच्या मालकीच्या व जिल्हाधिकारी, यांनी संस्थेला हस्तांतरीत केलेल्या जागेवर क्रिकेट प्रॅक्टीसकरिता नेट व चौकीदाराने अतिक्रमण केले आहे. रुग्णालय स्थलांतरीत करण्यासाठी ही दोन कारणे देण्यात आली आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी माजी पालकमंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
- या तीन जागांवर रुग्णालय स्थापन करण्याचा विचार
:: मिहान येथील ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ (एम्स) लगतची ६ एकर जागा
:: मिहान येथील पतंजली प्रकल्पाच्या समोरील १७ एकर जागा
:: वर्धा रोड, नागपूर लगतची ३० एकर जागा