लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीक्षाभूमीवर भूमिगत पार्किंगसाठी खोदलेला खड्डा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या महिनाभरापूर्वीपर्यंत समतल करण्यात यावा, तसेच आंदोलकांवरिल गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे, अशी मागणी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, दलित पँथर, रिपब्लिकन मुव्हमेंटसह विविध संघटनांनी केली. या सर्व संघटनांच्या एका प्रतिनिधीमंडळाने यासंदर्भात गुरूवारी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले.
दीक्षाभूमीवर विकास आकामांतर्गत भूमिगत पार्किंग केली जात होती. त्याला आंबेडकरी अनुयायांनी आक्षेप घेतला. ते काम बंद पाडण्यासाठी गेल्या १ जुलै रोजी दीक्षाभूमीवर मोठे आंदोलन झाले. कामाच्या ठिकाणी असलेल्या साहित्याची तोडफोड झाली. अनुयायांची भावना लक्षात घेऊन सरकारने भूमिगत पार्कींगचे काम रद्द केले. सध्या येथील काम बंद आहे. परंतु भूमिगत पार्किंगसाठी येथे मोठे खोदकाम झाल्याने मोठा खड्डा पडला आहे. सध्या पावसाचे दिवस आहे. या खड्ड्यात पाणी जमा होऊन ते स्मारकाच्या सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हा खड्डा तातडीने बुजविणे आवश्यक आहे. यासोबतच येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी होणारी गर्दी पाहता हा खड्डा कार्यक्रमाच्या किमान महिनाभरापूर्वी बुजविणे आवश्यक असल्याची बाब शिष्टमंडळाने निवेदनातून लक्षात आणून दिली. तसेच दीक्षाभूमीवरील आंदोलन हे उत्स्फुर्त होते. लोकभावनेचा आदर करीत आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावे, अशी मागणीही यात करण्यात आली.
शिष्टमंडळात समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक सुनील सारीपुत्त, प्रकाश दार्शनिक, अशोक बोंदाडे, एन.व्ही. ढोके, रितेश गायमुखे, भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड, रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वाहाने, भारतीय बौद्ध महासभेचे अविनाश कठाणे, प्रमोद मून, धर्मपाल आवळे, बानाईचे जयंत इंगळे आदींचा सहभाग होता.
स्मारक समिती बरखास्त करादीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे समाजाची दिशाभूल केली जाते. शासनातर्फे मिळालेल्या पैशाची उधळपट्टी केली जाते. त्यामुळे शासनातर्फे मिळालेल्या निधीचे लेखापरिक्षण करण्यात यावे, तसेच स्मारक समिती बरखास्त करण्यात यावी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेकडे स्मारकाचे काम सोपवण्यात यावे, अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा शांतिनगर शाखेतर्फे करण्यात आली. शिष्टमंडळातर्फे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. शिष्टमंडळात गौतम रंगारी, दिलीप महाजन, नागसेन मेश्राम, संजय उके, प्रदीप भिवगडे, अविनाश नारनवरे, बीना नगरारे आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.