लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा व भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी संघभूमीतून केंद्र तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. यशवंत सिन्हा यांनी केंद्राकडून ‘एलआयसी’च्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप लावला. देशातील वित्तीय संस्थांना नुकसानातून काढण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येत आहे. ‘आयएलअॅन्ड एफएस’चे हे संकट खूप मोठे आहे. मात्र यासाठी केंद्र सरकार ‘एलआयसी’चा निधीचा उपयोग करत आहे. हा निधी जनतेच्या हक्काचा आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.या दोन्ही नेत्यांनी पत्रपरिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ‘आप’चे खा.संजय सिंह, माजी आमदार आशीष देशमुख हेदेखील उपस्थित होते. देशात सध्या आणिबाणीहून वाईट स्थिती आहे. पंतप्रधान आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा न करताच निर्णय घेतात. मंत्र्यांना पंतप्रधानांच्या निर्णयांची माहिती नसते. देश कुठे चालला आहे, असा प्रश्न यशवंत सिन्हा यांनी केला.विजयादशमी सोहळ््यादरम्यान सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी राममंदिर निर्माणासाठी संसदेने कायदा करण्याची मागणी केली होती. मात्र हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे संसदेत कायदा करणे शक्यच नाही. मागील काही दिवसांपासून संघाकडून आपण बदलत असल्याचे दाखविण्यात येत आहे. याअंतर्गतच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उद्योगपती रतन टाटा, नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना संघाने आपल्या कार्यक्रमांत आमंत्रित केले. मात्र राममंदिरावर वक्तव्य देऊन संघाचा जुना चेहरा व विचार कायम असल्याचे दाखवून दिले आहे, असे यशवंत सिन्हा म्हणाले.मोदींनी माफी मागावीयावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी केंद्रावर प्रहार केला. ‘सीबीआय’, ‘ईडी’, ‘एनआयए’ यासारख्या संस्था सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे उध्वस्त होत आहेत. सरकार निवडणूकींच्या कामाला लागली आहे. जनतेच्या समस्यांशी त्यांना काही घेणेदेणे नाही, असा आरोप त्यांनी केला. राफेल करारातील घोटाळ््याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असेदेखील ते म्हणाले. पंतप्रधान महापुरुषांना ‘हायजॅक’ करुन आपली प्रतिमा चमकवत असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला.जयंत सिन्हांना समजवू नाही शकतयशवंत सिन्हा यांना त्यांचे पुत्र व केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्याबाबत विचारणा केली असता आम्ही एकमेकांच्या कामात दखल देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जयंत सिन्हा हे स्वत:चे निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना समजवू शकत नाही, असेदेखील ते म्हणाले.