अपघातात मृत व्यक्तीचे कुटुंबीयांनी केले अवयवदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे त्याच्या नातेवाईकांनी अवयवदान केले. यामुळे तीन व्यक्तींना जीवनदान तर दोन व्यक्तींची नेत्रज्योती परत आली आहे.
अवयवदान सप्ताहाच्या निमित्ताने महापालिका आणि आयएमएच्या वतीने जनजागृती सुरू आहे. यातून प्रेरणा घेत अवयवदानाचा हा निर्णय घेतला.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील दयानंद सहारे यांचा आरमोरी येथे अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. नागपुरातील मोहननगर येथील विम्स रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांना विम्सच्या डॉक्टरांनी मृत व्यक्तीच्या अवयवयाचे दान करण्यासाठी प्रवृत्त केले. कुटुंबीयांनी मंजुरी दिल्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दोन किडन्या दोन रुग्णालयात तसेच फुफ्फुस एका खासगी रुग्णालयाला दान करण्यात आले. मृत व्यक्तीचे डोळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये दान करण्यात आले. हृदयासाठी चेन्नईच्या डॉक्टरांची चमू नागपुरात दाखल झाली होती. मात्र अधिक वय आणि कमजोर हृदय यामुळे हृदय दान करता आले नाही.
मनपा व आयएमए यांच्या संयुक्त विद्यमाने मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून जनजागृती करीत आहे. नागरिकांना अवयवदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे.
महापौर दशाशंकर तिवारी व आयएमए अध्यक्ष डॉ. संजय देवतळे यांनी सहारे परिवाराचे व डॉक्टरांचे कौतुक केले आहे.