चारगाव शिवारातील कारवाई : साडेतीन लाखांचा ऐवज जप्तपारशिवनी : पोलिसांनी चारगाव शिवारात केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारा मेटॅडोर पकडला. त्यात दोघांना अटक करण्यात आली असून, मेटॅडोरमधील सात गाई व वासराची सुटका करीत जीवनदान देण्यात आले. ही सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात होती. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास करण्यात आली.मोहम्मद अशरफ मोहम्मद जलील (३३, रा. नयाबाजार, कामठी) व मोहम्मद यासीब अब्दूल अजिज (३० रा. लकडगंज, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पारशिवनी तालुक्यातील चारगाव, पेंच, सुवरधरा व कोलीतमारा येथील काही जनावरे मेटॅडोरमध्ये कोंबून त्यांची कामठीच्या दिशेने वाहतूक केली जात असल्याची माहिती मनीष वैद्य, विजय भुते व प्रवीण खुबाळकर यांना मिळाली होती. त्यांनी सदर माहिती ठाणेदार बी. एम. गायगोले यांना दिली. माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी पारशिवनी - रामटेक मार्गावरील चारगाव शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. त्यात सदर मेटॅडोरमध्ये सात गाई व एक वासरू कोंबले असल्याचे निदर्शनास आले. ही जनावरे कामठी येथील कत्तलखान्यात नेली जात असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी मेटॅडोर जप्त करून जनावरांची सुटका केली आणि दोन्ही आरोपींना अटक केली. या कारवाईमध्ये एकूण ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्व जनावरांना पारशिवनी ग्रामपंचायतच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आले. कामठी येथील फारुख नावाच्या व्यक्तीने ही जनावरे खरेदी केली होती. तो या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पारिशवनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार बी. एम. गायगोले, सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. खोकले, उपनिरीक्षक अनिल राऊत, पी. एस. सोनवणे आदींनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)
आठ गार्इंना जीवनदान
By admin | Published: March 26, 2016 2:49 AM