लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना पॉझिटिव्हिटी दर तसेच रुग्णांनी व्यापलेले ऑक्सिजन बेड या दोन निकषाच्या आधारे सोमवारपासून ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरू होत आहे. निकषाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, गोंदिया, यवतमाळ व चंद्रपूर या चार जिल्ह्यांचे जनजीवन रुळावर येण्याची शक्यता आहे. तर, तिसऱ्या टप्प्यातील भंडारा, वाशिम, अकोला, वर्धा, अमरावती, गडचिरोली व बुलडाणा जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित जिल्हा प्रशासन सोमवारी निर्णय घेणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के व ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असतील त्या जिल्ह्यात जवळपास पूर्ण ‘अनलॉक’ असेल. त्यानुसार पहिल्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांमध्ये मॉल, दुकाने, सिनेमा हॉल आणि सभागृहांसाठी वेळेचे बंधन नसेल. तर दुसऱ्या टप्प्यात यासाठी ५० टक्केच उपस्थितीची अट असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील. तर चौथ्या टप्प्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील आणि इतर दुकाने बंद राहतील. पाचव्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू राहतील. या ठिकाणी वीकेंड लॉकडाऊन लागू असेल. जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात येणार आहेत.
चार जिल्हे ‘अनलॉक’च्या पहिल्या टप्प्यात
जिल्हा : पॉझिटिव्हिटीचा दर : ऑक्सिजन बेड रिकामे
नागपूरचा :३.८६ टक्के : ९१ टक्के
चंद्रपूर :२.९९ टक्के :८५ टक्के
यवतमाळ : १.४५ टक्के : ७५ टक्के
गोंदिया : २.७ टक्के : ९६ टक्के
सात जिल्ह्यात अंशत: ‘अनलॉक’!
जिल्हा : पॉझिटिव्हिटीचा दर : व्यापलेले ऑक्सिजन बेड
भंडारा : ७.६७ टक्के :४.४१ टक्के
वाशिम : २.१ टक्के : ८ टक्के
अकोला :७.२४ टक्के : ४४.६७ टक्के
वर्धा : ७.५७ टक्के : ४.०४ टक्के
अमरावती: ४.६० टक्के : २४ टक्के
गडचिरोली: ६.५१ टक्के : ५.९२ टक्के
बुलडाणा:१०.०३ टक्के : ८ टक्के
तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध
अत्यावश्यक वस्तू व सेवासंबंधी व्यवसाय व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
इतर सर्व व्यवसाय व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.
रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळेत ५० टक्के आसनक्षमतेनुसार सुरू राहील.
सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, उद्याने, बगीचे, मॉर्निंग वॉक व सायकलिंग दररोज पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहील.
सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सोमवार ते शुक्रवारी ५० टक्के उपस्थितीत (सभागृहाच्या क्षमतेच्या) सायंकाळी ४ वाजेपर्यंत मुभा असेल.
लग्नसोहळ्यास ५० जणांची उपस्थिती. अंत्यसंस्कार २० जणांची उपस्थिती. इतर बैठका ५० टक्के उपस्थिती राहील.
कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई-कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी राहील.