लाेकमत न्यूज नेटवर्क
बेला : नांद नदीच्या पुराचे पाणी सायतर (ता. उमरेड) शिवारात शिरले आणि पूर ओलांडत असताना एक व्यक्ती वाहून गेली. मात्र, त्याने सागवान झाडाचा आश्रय घेतला. त्याला बेला पाेलीस आणि काही स्थानिक तरुणांनी दाेन तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर पुरातून सुखरूप बाहेर काढले.
डाॅ. चिन्मय नवकृष्ण विश्वास (५२, रा. बेसूर, ता. भिवापूर) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. भिवापूर व उमरेड तालुक्यातील मुसळधार पावसामुळे मंगळवारी (दि. २१) सकाळी नांदसह अन्य नद्या व नाल्यांना पूर आला हाेता. त्यातच धाेक्याची पातळी ओलांडल्याने नांद जलाशयाचे सात गेट अर्धा मीटरने तर वडगाव धरणाचे गेट २५ सेंमीने उघडण्यात आले. धरणातील पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग हाेत असल्याने तसेच मुसळधार पाऊस सुरू असल्याने नांद नदीकाठचा सायतर शिवार पाण्याखाली आला हाेता.
दरम्यान, डाॅ. चिन्मय विश्वास हे सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास सायतर शिवारातून पुरातून मार्ग काढत येत हाेते. पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांचा ताेल गेला व ते प्रवाहात आले. विशेष म्हणजे, त्यांना पाेहता येत नाही. वाहत जात असतानाच त्यांच्या हाती सागवान झाडाची फांदी आली आणि त्यांनी ती फांदी घट्ट धरून ठेवत झाडावर आश्रय घेतला. या प्रकाराची माहिती बेला पाेलीस व तरुणांना मिळताच त्यांनी डाॅ. चिन्मय विश्वास यांना पुरातून बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या.
ठाणेदार तथा सहायक पाेलीस निरीक्षक पंकज वाघाेडे, पाेलीस हवालदार शैलेंद्र मानकर, सुनील आगमने, निळकंठ कटाेरे, तुषार सलाम, राजू राठाेड यांनी सावंगी येथील चेतन भाेयार यांचा ट्रॅक्टर बाेलावला. आवश्यक साहित्य साेबत घेत सर्व जण त्या ट्रॅक्टरवर बसून पुरात डाॅ. चिन्मय यांच्या दिशेने निघाले. तब्बल दाेन तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांनी डाॅ. चिन्मय विश्वास यांना पुरातून सुखरूप बाहेर काढले. या बचाव कार्यात दुसऱ्या बाजूने पिपरा येथील नरेश कापटे, राजू हेडाऊ, विनाेद जुनघरे, धनराज हेडाऊ, जगदीश हजारे या तरुणांनी बचाव पथकातील सदस्यांना मदत केली.
...
अन् अनर्थ टळला
ठाणेदार पंकज वाघाेडे यांच्यासह सर्व सदस्य ट्रॅक्टरवर बसून सावंगी शिवारातील पूल ओलांडत हाेते. त्या पुलावरून पुराचे पाणी वाहत हाेते. चेतन भाेयर हे ट्रॅक्टरने पूर ओलांडण्याचा प्रयत्न करीत हाेते. मध्येच पाण्याच्या प्रवाहामुळे अख्खा ट्रॅक्टर डगमगायला लागला. मात्र, सर्वांनी हिंमत न हारता तसेच प्रसंगावधान बाळगत पूल व पूर पार केला. जर पाण्याचा प्रवाह तेज असता आणि ट्रॅक्टर वाहत गेला असता तर अनर्थ घडला असता.
...
गावांचा संपर्क तुटला
नांद नदीला आलेल्या पुरामुळे सावंगी शिवारातील पुलावरून माेठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत हाेते. त्यामुळे पिपरा, सायसर, सावंगी (बु.), सिंगाेरी, कळमना, सालई (खु) या गावांचा बेला व इतर गावांशी संपर्क तुटला हाेता. हा प्रकार वारंवार घडत असल्याने सिंगाेरी, कळमना व सावंगी शिवारातील पुलांची उंची वाढविणे गरजेचे आहे. उमरेडच्या नायब तहसीलदार अश्विनी नंदेश्वर यांनी बेला परिसरातील पूर परिस्थितीची पाहणी केली.