आॅनलाईन लोकमतनागपूर : अनेक दाक्षिणात्य आणि काही हिंदी चित्रपटात अभिनेत्री म्हणून काम करताना ब्रेस्ट कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी सामना होईल असा विचारही केला नव्हता. पस्तीशीच्या वयात या आजाराचा विळखा मोठा धक्का होता. मात्र लवकर निदान आणि मैत्रीने यातून सुखरुप बाहेर पडले. मात्र या आजाराने मोठा धडा शिकविला. चित्रपटात काम करताना ग्लॅमर असतेच. मात्र ग्लॅमर हा केवळ जीवनाचा एक भाग आहे, महत्त्वाचे जीवन आहे. यातून सामाजिक कामाची प्रेरणा मिळाल्याचे दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री व समाजसेविका गौतमी तडीमल्ला यांनी व्यक्त केली.पत्रकार क्लबच्यावतीने मिट दि प्रेस या कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना गौतमी यांनी अनेक विषयावर आपले मत व्यक्त केले. दक्षिणेतील अनेक भाषांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करताना २००४ मध्ये झालेल्या ब्रेस्ट कॅन्सरमुळे धडा मिळाला. आपण सुखरुप बाहेर पडलो, मात्र वंचित घटकातील असंख्य स्त्रिया या आजाराचा बळी ठरतात ही जाणीव त्यावेळी झाली. आपणही यांच्यासाठी काही करायला हवे हा विचार करीत छोट्या स्तरातून कार्य करायला सुरुवात केली. त्यावेळी केवळ ब्रेस्ट कॅन्सरच नाही तर आरोग्याच्या अनेक समस्यांची जाणीव झाली. आरोग्याच्या प्राथमिक सुविधांपासूनही असंख्य लोक वंचित आहेत. शिक्षणाचीही अवस्था वाईट आहे. त्यामुळे आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात स्थायी काम करण्यासाठी त्यांनी ‘लाईफ अगेन फाऊंडेशन’ची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आदी भागात जनजागृतीचे अनेक कार्यक्रम राबविल्याचे सांगितले. गरजू आणि मदतनीसांना जोडण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. यावेळी पत्रकार क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, ब्रह्माशंकर त्रिपाठी, डॉ. विरल कामदार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस अॅन्ड ह्यूमन रिसोर्सेसकडून कृत्रिम अंग मिळालेल्यांना गौतमी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. नागपुरातही केंद्र सुरू करण्याची इच्छाना. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये आरोग्य, शिक्षण व इतर क्षेत्रात चांगले काम सुरू आहे. दक्षिणेकडे ते करता यावे म्हणून नागपूरला केंद्र सुरू करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.शिक्षण क्षेत्रात बदलाची गरजआजच्या शिक्षण सिस्टीममध्ये विद्यार्थ्यांची अवस्था वाईट झाली आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत त्यांना राबावे लागते. यातून तणाव आणि आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यात बदल होण्याची गरज आहे. त्यासाठी शैक्षणिक अभ्यासासह थोडा खेळ, कौटुंबिक मिलन, विचार विनिमय विद्यार्थ्यांना मिळेल असे शैक्षणिक मॉडेल विकसित करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे गौतमी यांनी स्पष्ट केले.अभिव्यक्ती स्वातंत्र महत्त्वाचेचअभिनेता प्रकाश राज यांनी व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक आहे व त्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे. मात्र ‘पद्मावती ’ चित्रपटासाठी मिळालेल्या धमक्या योग्य नाहीत. क्षुल्लक वादाला मोठे केले जात आहे. धमक्या देणाऱ्या बहुतेकांनी हा चित्रपटच पाहिला नसेल. हा चित्रपट पहा, चर्चा करा आणि सामंजस्याने हा विषय सोडविला जाऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
जीवन महत्त्वाचे, ग्लॅमर केवळ एक भाग :गौतमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:42 PM
चित्रपटात काम करताना ग्लॅमर असतेच. मात्र ग्लॅमर हा केवळ जीवनाचा एक भाग आहे, महत्त्वाचे जीवन आहे. यातून सामाजिक कामाची प्रेरणा मिळाल्याचे दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री व समाजसेविका गौतमी तडीमल्ला यांनी व्यक्त केली.
ठळक मुद्देचित्रपट अभिनेत्री ते सामाजिक कार्याचा प्रवास