लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयानेखून खटल्यातील दोन आरोपी भावांना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. आर. पटारे यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.नीतेश (२५) व अजय भरतलाल शाहू (२८) अशी आरोपी भावांची नावे असून ते सहकारनगर येथील रहिवासी आहेत. मयताचे नाव चंद्रशेखर मालोदे (२७) होते. तो विजयालक्ष्मी पंडितनगर येथे राहात होता. त्याला दारूचे व्यसन होते. तो आरोपी अजय शाहूसोबत नेहमीच दारू पित होता. तसेच, कधीकधी त्याच्यासोबतच पेंटिंगचे काम करीत होता. २९ मे २०१६ रोजी रात्री १० च्या सुमारास चंद्रशेखर व त्याचा मित्र चेतन सुपारे हे आरोपींच्या घरी गेले होते. दरम्यान, त्यांच्यात एका प्रकरणावरून वाद झाला व आरोपींनी चंद्रशेखरला चाकूने सपासप वार करून ठार मारले. चंद्रशेखरचा मोठा भाऊ राजेंद्रने ३० मे २०१६ रोजी नंदनवन पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक गणेश ठाकरे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. पंकज तपासे यांनी कामकाज पाहिले.