लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या भांडणावरून चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप व ५० हजार रुपये दंड, अशी कठोर शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना १६ आॅगस्ट २०१४ रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास सीताबर्डी पोलिसांच्या हद्दीत घडली होती.गौतम मोतीराम भांगे (५९) असे आरोपीचे नाव असून, तो वलनी (खंडाळा) येथील रहिवासी आहे. मयताचे नाव शांताराम उकनराव भांगे (४७) होते. शांताराम पोलीसपाटील होते. त्यांचे आरोपीसोबत पटत नव्हते. गावामध्ये त्यांची अनेकदा भांडणे झाली होती. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. घटनेच्या दिवशी शांताराम रेशन दुकानाचा परवाना व पोलीस पाटीलपदाच्या नूतनीकरणासाठी ग्रामीण तहसील कार्यालयात आले होते. आरोपीही त्यांचा पाठलाग करीत कार्यालयात गेला होता. त्याच्याजवळ कुऱ्हाड होती. दरम्यान, आरोपीने संधी मिळताच शांतारामवर हल्ला केला. शांताराम यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे शांताराम गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. शांताराम यांचे मित्र राजेंद्र नवघरे (२८) यांनी पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली. सत्र न्यायालयात सरकार पक्षाने आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी १७ साक्षीदार तपासले. सरकारतर्फे अॅड. राजेंद्र मेंढे यांनी कामकाज पाहिले.