नागपूर : नऊ वर्षापूर्वी वाडी येथील प्रॉपर्टी डिलरचा खून करणाऱ्या पाच कुख्यात आरोपींना सोमवारी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावण्यात आली तर, तीन आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले. सत्र न्यायालयाचे न्या. एस. ए. एस. एम. अली यांनी हा निर्णय दिला.
अजित रमेश सातपुते (३४), रितेश ऊर्फ गब्बू महेश गुप्ता (२९), राकेश ऊर्फ छोटू रावरतन वाघमारे (३१), सूरज ऊर्फ बावा प्रदीप कैथवास (३१) व अमित ऊर्फ मार्बल मनोहर अंडरसहारे (३२) अशी आरोपींची नावे आहेत. सातपुते शिवशक्तीनगर, अमरावती रोड, गुप्ता वानाडाेंगरी, वाघमारे नवीन नरसाळा, कैथवास चंद्रमणीनगर तर, अंडरसहारे दत्तवाडी येथील रहिवासी आहेत. निर्दोष सुटलेल्या आरोपींमध्ये अशोक शंकर खोब्रागडे (४५, रा. आंबेडकरनगर, वाडी), सुनील वसंत चुनारकर (४३, रा. कळमेश्वर) व देवकुमार ऊर्फ पापा टिल्लू राणे (४३, रा. कामठी) यांचा समावेश आहे. मृताचे नाव रोशन देविदास कांबळे (३५) होते. कांबळे देखील गुन्हेगार होता. त्याचे व आरोपींचे जुने शत्रुत्व होते. एक दिवस आरोपी अजित सातपुतेने वाडी येथील महादेव साळवेचा खून केल्यानंतर कांबळेने आरोपींना तातडीने अटक व्हावी, यासाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यामुळे कांबळेवर आरोपी चिडले होते. त्यातून त्यांनी कांबळेचा काटा काढण्याचा निश्चय केला होता. ते सतत संधीच्या शोधात होते. दरम्यान, १२ जुलै २०१४ रोजी दुपारी १.४५ च्या सुमारास आरोपींनी कांबळेच्या दवलामेटी रोडवरील कार्यालयात शिरून त्याचा तलवार, चाकू इत्यादी धारदार शस्त्रांनी सपासप वार करून खून केला.
अशी आहे पूर्ण शिक्षा
१ - कलम ३०२ (खून) अंतर्गत जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास.
२ - कलम १४८ (सशस्त्र दंगा) अंतर्गत सहा महिने कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास.
३ - कलम ४२७ (आर्थिक नुकसान करणे) व ४४७ (कार्यालयात बळजबरीने प्रवेश) या दोन्ही गुन्ह्यांसाठी प्रत्येकी तीन महिने कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास.
खटल्यादरम्यान एका आरोपीचा खून
पांढराबोडी येथील संजय ऊर्फ भुऱ्या ऊर्फ बादशहा कंदई बनोदे (३५) हा सुद्धा या प्रकरणात आरोपी होता. न्यायालयात खटला प्रलंबित असताना त्याचा खून झाला. त्यामुळे त्याचे नाव खटल्यातून वगळण्यात आले. याशिवाय, जयताळा येथील एका विधि संघर्षग्रस्त बालकाचा आरोपींमध्ये समावेश आहे. त्याच्याविरुद्ध बाल न्यायालयात खटला चालविण्यात आला.
सरकारने तपासले २३ साक्षीदार
न्यायालयात सरकारच्या वतीने अनुभवी वकील ॲड. कल्पना पांडे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी आरोपींविरुद्ध एकूण २३ साक्षीदार तपासले. त्यात एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रघुवीर चौधरीचा समावेश होता. ही घटना घडली त्यावेळी चौधरी कांबळेच्या कार्यालयात बसला होता. त्याचा जबाब पाच आरोपींविरुद्धचे गुन्हे सिद्ध होण्यास उपयोगी ठरला. त्याला फितूर करण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न करण्यात आले होते, पण तो शेवटपर्यंत जबाबावर टिकून राहिला.