आंतरधर्मीय विवाहानंतर पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 9, 2023 05:59 PM2023-05-09T17:59:43+5:302023-05-09T18:00:11+5:30
Nagpur News आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम पतीला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, त्याच्यावर एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.
राकेश घानोडे
नागपूर : आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम पतीला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, त्याच्यावर एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आणि दंडाची रक्कम जमा न केल्यास त्याला दोन वर्षे अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एस. बी. अग्रवाल यांनी हा निर्णय दिला.
असीम पठाण ताज मोहम्मद पठाण (३९) असे आरोपीचे नाव असून तो काटोल रोड, मानकापूर येथील रहिवासी आहे. मृताचे नाव महिमा विटोले (२०) होते. ती छायाचित्रे व मेहंदी काढण्याचा व्यवसाय करीत होती. सोबतच उच्च शिक्षणही घेत होती. तिचे व असीमचे घटनेच्या दोन वर्षापूर्वीपासून प्रेम संबंध होते. दरम्यान, तिने वयाची १८ वर्षे पूर्ण होताच असीमसोबत आंतरधर्मीय विवाह केला. त्यानंतर ते काही दिवस गुण्यागोविंदाने राहिले. परंतु, पुढे त्यांचे कोणत्याना कोणत्या कारणावरून खटके उडायला लागले. असीम महिमाच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. परिणामी, त्यांचे नेहमी भांडण होत होते. त्यामुळे महिमा गोधनी रोडवरील शिवनगर येथील माहेरी राहायला गेली होती. असीमला तिचे माहेरी जाणेही पटले नाही. तो महिमाच्या लहान बहिणीला रोज फोन करीत होता व महिमाबाबत विचारपूस करून तिला त्रास देत होता. एक दिवस त्याने महिमा सासरी परत न आल्यास तिला ठार मारण्याची धमकी देखील दिली होती. मात्र, तो एवढ्या टोकाला जाईल, असे कोणालाच वाटले नाही. ३० एप्रिल २०१८ रोजी रात्री ८ च्या सुमारास असीमने महिमाला फोन करून कोणत्यातरी अज्ञात कारणाने भेटण्यासाठी बोलावले. महिमाने त्याच्यावर विश्वास ठेवला व ती गोधनी रोडवरील गजानननगर परिसरात त्याला भेटण्यासाठी गेली. त्यावेळी असीमने असावध व असहाय्य असलेल्या महिमावर धारदार चाकूने हल्ला केला व तिला जाग्यावरच ठार मारले.
फिर्यादीला भरपाई देण्याचा आदेश
आरोपीने दंड जमा केल्यास ती रक्कम महिमाची आई फिर्यादी अंबिका विटोले हिला भरपाई म्हणून अदा करा, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. आसावरी परसोडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब व इतर विविध ठोस पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला. आरोपी १ मे २०१८ पासून कारागृहात आहे.