नागपूर : काठीने जबर मारहाण करून आईचा खून करणाऱ्या मुलाची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्तिद्वय रोहित देव व ऊर्मिला जोशी यांनी हा निर्णय दिला. ही घटना अजनी पोलिसांच्या हद्दीतील आहे.
किशोर ऊर्फ बजरंग मुकुंद रामटेके (६२) असे आरोपीचे नाव असून तो सावित्रीबाई फुलेनगर येथील रहिवासी आहे. आईने आरोपीला नऊ महिने गर्भात सांभाळून जन्म दिला व वाढविले. आरोपीने त्याच आईला ठार मारले. आईच्या शरीरावरील जखमांवरून आरोपीने तिला निर्दयीपणे मारहाण केल्याचे दिसून येतेे, अशी भावना न्यायालयाने हा निर्णय देताना व्यक्त केली. मृताचे नाव कमलाबाई होते.
व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या आरोपीमध्ये विविध दुर्गुण होते. त्यामुळे त्याची पत्नी मुलांना सोबत घेऊन वेगळी राहत होती. दरम्यान, २१ मे २०१७ रोजी रात्री आरोपीने आईचा खून केला. २९ डिसेंबर २०१८ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला खुनाच्या गुन्ह्याकरिता दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून आरोपीचे अपील फेटाळण्यात आले.