नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेप व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक. व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. ही घटना वाशीम जिल्ह्यातील आहे.
अंबादास किसन गडेकर (५०) असे आरोपीचे नाव असून तो जयपूर येथील रहिवासी आहे. मयताचे नाव रामराव राठोड होते. आरोपी व मयतामध्ये जुने शत्रुत्व होते. त्यातून ६ ऑक्टोबर २०१५ रोजी अंबादास याच्यासह दत्ता किसन गडेकर, सचिन श्रीरंग दवणे व सुनिता अंबादास गडेकर यांनी राठोडचा चाकू भोसकून खून केला अशी पोलीस तक्रार होती. १५ डिसेंबर २०१६ रोजी सत्र न्यायालयाने केवळ अंबादासला जन्मठेप व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. इतर आरोपींना निर्दोष सोडले. अंबादासने त्याच्या शिक्षेविरुद्ध तर, राठोडची पत्नी संगीताने इतर आरोपींना निर्दोष सोडण्याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता दोन्ही अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.