नागपूर : आपल्या शेजारणीला रॉकेल ओतून जिवंत जाळून ठार मारणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. वामन राजाराम राऊत (टेलर) (६४) असे आरोपीचे नाव असून, तो सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आजनी गावचा रहिवासी आहे.झामवतीबाई अजाबराव वरठी (५०), असे मृताचे नाव होते. ही घटना आजनी येथे १७ आॅगस्ट २०१२ रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली होती. सरकार पक्षानुसार या घटनेची हकीकत अशी, घटनेच्या आठ वर्षांपूर्वीपासून झामवतीबाई आपल्या पतीपासून वेगळी राहून गावातील आबादीच्या जागेवर झोपडी बांधली होती. या झोपडीतच ती राहत होती. आरोपी वामन हा नेहमीच दारूच्या नशेत या महिलेसोबत भांडण करायचा आणि माझ्या घरापुढे झोपडी का बांधली, अशी विचारणा करीत तू या ठिकाणाहून निघून जा असे म्हणायचा. घटनेच्या दिवशी त्याने या महिलेच्या घरात शिरून तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळून टाकले होते. २१ आॅगस्ट रोजी मेडिकल कॉलेज इस्पितळात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. तिचे मृत्युपूर्व बयाण नोंदवण्यात आले होते. या बयाणावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक डी.के. राठोड यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने ११ आणि बचाव पक्षाच्या वतीने दोन साक्षीदार तपासण्यात आले होते. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन आरोपी वामन टेलरला भादंविच्या ३०२ कलमांतर्गत जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, कलम ४५२ अंतर्गत एक वर्ष कारावास आणि एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत भांडेकर, संदीप डोंगरे यांनी काम पाहिले. पोलीस उपनिरीक्षक आर.डी. ठाकूर, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण महल्ले, संतोष महंत, शुक्ला यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)
शेजारणीला जिवंत जाळणाऱ्यास जन्मठेप
By admin | Published: February 26, 2015 2:21 AM