लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुऱ्हाडीने डोक्याचे दोन तुकडे करून तरुणाला ठार मारणाऱ्या आरोपी वडील व दोन मुलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जन्मठेप व प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच, दंडाची रक्कम मयताच्या कुटुंबीयांना अदा करण्याचे निर्देश दिले. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
मारोती किसन बिटे असे आरोपी वडिलाचे तर, देवेंद्र व देवानंद अशी आरोपी मुलांची नावे असून ते विहीरगाव, जि. यवतमाळ येथील रहिवासी आहेत. मयताचे नाव प्रवीण गाडगे होते. ही घटना १६ मार्च २०१६ रोजी घडली होती. आरोपी मारोती प्रवीणच्या शेताला लागून असलेल्या धुऱ्यावरील बाभळीची झाडे तोडत होता. त्यावरून वाद झाला. दरम्यान, मारोती व देवानंद यांनी प्रवीणला पकडून ठेवले व देवेंद्रने त्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे प्रवीणच्या डोक्याचे दोन भाग होऊन तो जाग्यावरच ठार झाला.
२५ ऑक्टोबर २०१७ रोजी सत्र न्यायालयाने मारोती व देवानंदला निर्दोष सोडले होते तर, देवेंद्रला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून ७ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या प्रकरणात पाच प्रत्यक्षदर्शी साक्षिदारांचे बयाण व ठोस पुरावे आहेत. परंतु, सत्र न्यायालयाने त्यावर योग्यरीत्या विचार केला नाही. दोन आरोपींना चुकीच्या पद्धतीने निर्दोष सोडले व एका आरोपीला कमी शिक्षा सुनावली असे सरकारचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाला रेकॉर्डवरील पुरावे तपासल्यानंतर सरकारच्या मुद्यांमध्ये तथ्य आढळून आले. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून हा सुधारित निर्णय देण्यात आला. राज्य सरकारच्या वतीने ॲड. तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिले.