पिवळी नदी भागातील घटना : शरीरसंबंधास दिला होता नकार नागपूर : शरीरसंबंधास नकार दिल्याने एका महिला सुरक्षा कर्मचाऱ्याचा नारळाच्या दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून करणाऱ्या एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश उमर सादिक यांच्या न्यायालयाने जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सुनील श्यामलाल केवट, असे आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेशच्या मंडला जिल्ह्याच्या पाठ चुटका येथील रहिवासी आहे. रुखसानाबेगम मोहम्मद रफिक शेख (४०), असे मृत महिलेचे नाव होते. ती भदंत आनंद कौशल्यायननगर येथील रहिवासी होती. तिच्या खुनाची घटना १९ एप्रिल २०१५ च्या रात्री घडली होती. सरकार पक्षानुसार घटनेची हकीकत अशी की, रुखसानाबेगम ही पिवळी नदी स्मॉल फॅक्टरी एरिया येथील मोहम्मद अशरफ यांच्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी रात्रीच्या गार्ड ड्युटीवर होती. ती इक्बाल अहमद खान यांच्या इंजिनिअर्स सेक्युरिटी सर्व्हिसेसमध्ये नोकरी करीत होती. बांधकामाच्या ठिकाणी बाजूलाच आॅक्सिजन सिलिंडरचे गोदाम होते. या ठिकाणी आरोपी सुनील केवट हा हमालीचे काम करायचा. घटनेच्या पंधरा दिवसांपूर्वीच रुखसाना आणि सुनीलमध्ये मैत्री झाली होती. घटनेच्या दिवशी तिने सुनीलसाठी जेवणही आणले होते. घटनेच्या दिवशी रात्री ८ वाजेनंतर दारूच्या नशेत असलेल्या सुनील केवट याने रुखसानाला शरीरसबंधाची मागणी करताच तिने नकार दिला होता. दोघांमध्ये झटापट होऊन केवटने नारळाच्या दोरीने तिचा गळा आवळून खून केला होता. मृतदेह मोहम्मद अशपाक याच्या घराच्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणच्या टिनपत्र्याच्या चौकीमागे फेकून देऊन तो बेपत्ता झाला होता. पळून जाताना त्याने रुखसानाचा मोबाईल सोबत नेला होता. हा मोबाईल त्याने आपल्या गावातील एका महिलेला ७५० रुपयात विकला होता. दुसऱ्या दिवशी २० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास रुखसानासोबत सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारी महिला रोशन परवीन ही कामावर आली असता तिला रुखसानाचा मृतदेह आढळला होता. प्रारंभी यशोदरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. उत्तरीय तपासणीत रुखसानाचा गळा आवळल्याचे निष्पन्न होताच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या अभिप्रयावरून आणि शहनाज सलीम अंसारी (३५) रा. बंदे नवाजनगर या महिलेच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केवटला २१ एप्रिल रोजी त्याच्या गावात अटक करण्यात आली होती. संपूर्ण प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होते. न्यायालयात एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी जुळून गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील राजेंद्र मेंढे, मिलिंद पिंपळगावकर यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल फय्याज आणि नामदेव पडोळे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत सारणे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी होते. (प्रतिनिधी)
महिला सुरक्षा कर्मचाऱ्याच्या खुनात जन्मठेप
By admin | Published: July 27, 2016 2:55 AM