- केंद्र सरकारचा सर्वाधिक कर : पेट्रोल दरवाढीने सर्वसामान्य त्रस्त, दरवाढ कमी करा
नागपूर : कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार गेले आहेत; तर दुसरीकडे महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. पाच राज्यांतील निवडणुकांचा काळ वगळता ६ मेपासून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच आहे. १३ मेपर्यंत पेट्रोलियम कंपन्यांनी सहावेळ दरवाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्याचा फायदा ग्राहकांना न देता केंद्र सरकार उत्पादन कर वाढवून पेट्रोल आणि डिझेलचे दर निरंतर वाढवीत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. पेट्रोलियम कंपन्या मध्यरात्री काही पैशांची दरवाढ करून ग्राहकांच्या खिशातून छुप्या पद्धतीने पैसे वसूल करीत आहे. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या दरवाढीने १३ मे २०२१ रोजी पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९८.२४ रुपयांवर पोहोचले आहे. कोरोनाच्या काळात आयुष्य ‘लॉक’ असतानाही पेट्रोल दरवाढ ‘अनलॉक’ आहे. दरवाढीचा आलेख पाहता गेल्या ३० वर्षांत पेट्रोलची लिटरमागे जवळपास ८४ रुपयांची वाढ झाली आहे.
मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आले, तेव्हा पेट्रोलवर ९.४८ रुपये, तर डिझेलवर ३.५६ रुपये केंद्राचा उत्पादन कर होता. गेल्या सात वर्षांत पेट्रोलवरील उत्पादन कर ३५० टक्के, तर डिझेलवरील उत्पादन कर ९०० टक्के वाढला. आयात करातील वाढ वेगळी आहे. याचे कारण गेल्या सात वर्षांत क्रूड तेलाच्या किमती जसजशा कमी झाल्या, त्याच प्रमाणात मुख्यत: केंद्र सरकारने करांचे प्रमाण त्या पटीत वाढविले आहे.
पेट्रोल दर (प्रतिलिटर) (ग्राफ)
मे १९९१ १४.६२ रुपये
मे २००१ २७.३६ रुपये
मे २०११ ६८.६४ रुपये
मे २०२१ ९८.२४ रुपये
तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्स जास्त
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीनुसार देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरतात. कच्च्या तेलाचे रिफायनरीमध्ये शुद्धीकरण आणि पेट्रोल पंपावर उपलब्ध होईपर्यंत पेट्रोलचे प्रत्यक्ष दर ३३ ते ३६ रुपये लिटर पडतात; पण त्यावर वेगवेगळे कर लागतात. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर कमी असले तरीही पेट्रोल महाग मिळते; कारण तेलाच्या किमतीपेक्षा कर जास्त आहे. यामध्ये केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा वाटा वेगवेगळा आहे. समजा, एक लिटर पेट्रोलचा दर १०० रुपये असेल तर त्यांपैकी जवळपास ६४ टक्के कर असतो. कर वगळता शुद्धीकरणानंतर ३६ रुपये लिटर पेट्रोलच्या किमतीत कच्च्या तेलाच्या किमती, प्रक्रिया, डीलर्स यांचा वाटा असतो. एक लिटर पेट्रोलचा एक्स रिफायनरी दर ३३.८२ रुपये असेल, तर त्यात ०.३२ रुपये वाहतूक खर्च, उत्पादन शुल्क ३८.५७ रुपये, डीलरचे कमिशन ३.६८ रुपये, मूल्यवर्धित कर (व्हॅट) २३.७५ रुपये आणि स्थानिक करांसह ग्राहकांकडून पंपावर प्रतिलिटर किंमत म्हणून ९८.२४ रुपये घेतले जातात.
- तर पुन्हा सायकलवरून फिरावे लागणार !
पेट्रोलचे दर या गतीने वाढत राहिल्यास काही महिन्यांतच पुन्हा सायकलवरून फिरावे लागणार आहे. विकासाच्या नावाखाली करवाढ करून पेट्रोलचे दर वाढवून केंद्र सरकार काय साध्य करीत आहे, हे कळत नाही. पेट्रोलचे दर कमी व्हावेत.
दिलीप धोटे, नागरिक़
लांब अंतराचा प्रवास नाहीच
पेट्रोलच्या किमतीमुळे कारने १०० कि.मी. अंतर जायचे झाल्यास हिंमत होत नाही. हे अंतर पार करायला जवळपास ८०० रुपये लागतात. त्यापेक्षा एस.टी.ने प्रवास करतो. महागाईत पेट्रोलची दरवाढ चुकीची आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.
- श्रीकांत जयस्वाल
महागाईचा भार जीवघेणा
कोरोनाच्या काळात आधीच उत्पन्न कमी झाले आहे. त्यातच सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. पेट्रोल व डिझेलने त्यात भर टाकली आहे. सामान्य नागरिक १०० रुपयांनी लिटर पेट्रोल भरणार कसे? आता जवळचा प्रवास पुन्हा सायकलवरूनच करावा लागेल.
- अतुल जोशी, नागरिक