लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे प्रचंड आर्थिक कोंडी झाल्याने उत्तर नागपुरातील एक बहुचर्चित ढाबा संचालक तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्या भागात गस्तीवर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखविल्यामुळे त्याचा जीव वाचला.राजपालसिंग भामरा असे ढाबा मालकाचे नाव असून, ते बाबा बुद्धाजी नगरात राहतात. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजू ढाबेवाला म्हणून भामरा यांची चांगली ओळख आहे. स्वादिष्ट भोजनामुळे काही वर्षांपूर्वी या ढाब्यावर जेवणासाठी खवय्यांची प्रचंड मोठी गर्दी होत होती, नंतर त्या भागात अनेक ढाबे झाल्याने हळूहळू ती गर्दी ओसरली. तरी भामरा यांच्या ढाब्यावर अजूनही खवय्ये गर्दी करतात. लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून भामरा यांचा ढाबा बंद आहे. त्यात त्यांची प्रकृतीही एक महिन्यापासून बिघडली आहे. मोठी आर्थिक कोंडी झाल्यामुळे त्यांनी शनिवारी आत्महत्येचा निर्णय घेतला आणि ते दुपारी घराबाहेर पडले. शुक्रवारी तलावावर पोहोचले. त्यांची एकूण अवस्था लक्षात आल्याने तेथे गस्तीवर असलेले वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी अनिल तिवारी, रामेश्वर वंजारी, प्रणोती कुकडे आणि त्यांच्या एका अन्य सहकाऱ्यांनी भामरा यांना रोखले. पोलिसांनी ताब्यात घेताच त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या.आर्थिक कोंडीमुळे स्वत:चा औषधोपचार आणि घरच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी फार अडचण होत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्या कुटुंबीयांनाही नंतर बोलवून घेण्यात आले. भामरा यांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले.