थरारक घटना : पत्नी, मुलगा व मुलीला ठार मारून आत्महत्येचा प्रयत्ननागपूर : पत्नी, मुलगा व मुलीला ठार मारून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. शैलेश हरीवंश शुक्ला (४१) असे आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेश येथील मूळ रहिवासी आहे. रेल्वेत आचारी म्हणून कार्य करणारा आरोपी घटनेच्या काळात अजनी रेल्वे कॉर्टर येथे कुटुंबासह रहात होता. त्याची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. यामुळे तो सतत चिंता करीत होता. यातून त्याने हे निर्घृण कृत्य केले असा संशय आहे. त्याच्या पत्नीचे नाव सुलेखा, मुलाचे नाव आकाश तर, मुलीचे नाव प्रिया होते. आरोपीने तिघांवरही कोयत्याने वार केले. तसेच, स्वत:चा गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. २१ डिसेंबर २०१२ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सत्र न्यायालयाने आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी आढळून आल्यामुळे त्याला वैद्यकीय मंडळाकडे पाठविले होते. दरम्यान, खटला थांबविण्यात आला होता. आरोपी ठीक झाल्यानंतर खटला चालविण्यात आला. उच्च न्यायालयानेही आरोपीची सध्याची मानसिक अवस्था तज्ज्ञांकडून तपासून नंतरच अपीलावर अंतिम सुनावणी केली. आरोपीतर्फे अॅड. डी. व्ही. चव्हाण तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील निवेदिता मेहता यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी) अशी आहे घटना२८ एप्रिल २००९ रोजी रात्री १० च्या सुमारास आरोपी हा बायका-पोरांना मारत असल्याचे फिर्यादी शैलेश शुक्ला यांना कळले. ते आरोपीच्या घरी पोहोचले असता दार आतून बंद होते. अनेकदा आवाज देऊनही दार उघडण्यात आले नाही. काही वेळानंतर दार तोडले असता आरोपीसह त्याची पत्नी व मुले रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेले आढळून आले. बायको व पोरांचा जाग्यावरच मृत्यू झाला होता. आरोपी जिवंत असल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. तो वाचला. इमामवाडा पोलिसांनी घटनेचा तपास केला होता.
तिहेरी हत्याकांडातील आरोपीची जन्मठेप कायम
By admin | Published: August 24, 2015 2:43 AM