नागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या पतीला शुक्रवारी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायालयाचे न्या. ए. एम. देशमुख यांनी हा निर्णय दिला.
रामदिनेश रामलच्छन मिश्रा (४९), असे आरोपी पतीचे नाव आहे. मृताचे नाव मंजुला ऊर्फ बुटीबा होते. हे दाम्पत्य अल्पवयीन मुलगी प्राची हिच्यासह पांढराबोडी येथील सध्धू पटेलच्या घरी भाड्याने राहत होते. रामदिनेशला मंजुलाच्या चारित्र्यावर संशय होता. तो मंजुलासोबत नेहमी भांडण करीत होता. तिला मारहाण करीत होता. त्याने मंजुलाविरुद्ध भरोसा सेलमध्ये तक्रारही नोंदविली होती. १७ मे २०१८ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास आरोपीने नेहमीप्रमाणे मंजुलासोबत वाद घातला.
दरम्यान, त्याने घरातील दोन चाकूंनी मंजुलाचा गळा, पोट व हातपायावर वार केले. त्यामुळे मंजुला गंभीर जखमी होऊन जाग्यावरच ठार झाली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. वर्षा सायखेडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी १२ साक्षीदार तपासले. तसेच, इतर विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.