लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीला ठार मारणाऱ्या पतीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. हे प्रकरण गोंदिया जिल्ह्यातील आहे.
राजकुमार भुरेलाल चौधरी (३५) असे आरोपी पतीचे नाव असून तो काटुर्ली, ता. आमगाव येथील रहिवासी आहे. मृताचे नाव भूमाबाई ऊर्फ रंजिता होते. तिचे घटनेच्या आठ वर्षांपूर्वी चौधरीसोबत लग्न झाले होते. चौधरी मजुरी करीत होता. तो भांडखोर होता. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून रंजितासोबत वाद घालत होता. तिला जबर मारहाण करीत होता. एकदा त्यांचा वाद तंटामुक्ती समितीपुढेही गेला होता. त्यावेळी चौधरीने माघार घेतल्यामुळे रंजिता त्याच्यासोबत राहायला तयार झाली होती. ७ मे २०११ रोजी चौधरीने नेहमीप्रमाणे भांडण केले. दरम्यान, त्याने रंजिताला गंभीर मारहाण केली व दोराने गळा आवळून तिचा खून केला. २१ मार्च २०१७ रोजी सत्र न्यायालयाने खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे चौधरीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. ते अपील गुणवत्ताहीन ठरवून फेटाळण्यात आले.