सासरच्या चौघांना दिले होते अन्नातून विष : दोघे बचावले होतेनागपूर : सासरच्या चौघांना अन्नातून विष देऊन सासू आणि नणंद यांचा खून करणाऱ्या आणि अन्य दोघांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला आरोपीस चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेप व अन्य सर्व शिक्षा उच्च न्यायालयाचे न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. विनय देशपांडे यांच्या खंडपीठाने रद्द करून तिला दोषमुक्त केले. सुनिता किशोर सोयाम (२०), असे आरोपी महिलेचे नाव असून ती चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल येथील रहिवासी आहे. प्रकरण असे की, सुनिताचा विवाह मे २०१० मध्ये किशोर सोयामसोबत झाला होता. खुद्द किशोर, त्याचे वडील मंगरू (६०), आई कमलाबाई (५०), भाऊ सचिन (२१) आणि नणंद सोनी (१८) आणि खुद्द सुनिता एकत्र राहत होते. सुनिता ही किशोरला सतत मला तू पसंत नाहीस, माझ्या वडिलाने माझ्या इच्छेविरुद्ध लग्न करून दिले आहे. ती भांडण करून किशोरला टोचून बोलायची, सोडचिठ्ठी मागत होती, सोडचिठ्ठी दिली नाही तर सर्वांना पाहून घेण्याची धमकी देत होती. तिने मंगळसूत्रही तोडून फेकले होते. ४ जानेवारी २०१२ रोजी किशोर हा कामानिमित्त बाहेर गेला होता. तो रात्री ९ वाजताच्या सुमारास घरी परतला असता त्याला त्याचे आई, वडील, भाऊ आणि बहीण उलट्या करताना दिसले होते. त्यांनी सुनिताने जेवणातून विष दिल्याचे त्याला सांगितले होते. या सर्वाना शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले असता कमलाबाई आणि सोनीचा मृत्यू झाला होता. उपचारानंतर मंगरू आणि सचिन हे दोघे बचावले होते. किशोरच्या तक्रारीवरून मूल पोलिसांनी ७ जानेवारी २०१२ रोजी भादंविच्या ३०२, ३०७, ३२८ कलमान्वये गुन्हा दाखल करून सुनिताला अटक केली होती. १२ मार्च २०१३ रोजी चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनिताला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप, १ हजार रुपये दंड, ३०७ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि ३२८ कलमांतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली होती. या सर्व शिक्षांना आव्हान देणारे अपील सुनिताने उच्च न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयात आरोपी महिलेच्यावतीने अॅड. राजेंद्र डागा यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
सासू आणि नणंदेच्या खुनातील महिलेची जन्मठेप हायकोर्टात रद्द
By admin | Published: February 21, 2016 3:07 AM