लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : घरातून शेताकडे आणि शेतातून घराकडे येता-जाता गुडघाभर चिखलातून त्यांना माथापच्ची करावी लागते. कधी बैलाची जोडीच बैलगाडीसह चिखलात फसते. कधी बैलगाडीचे चाकच पुढे सरकत नाहीत. एकीकडे चिखलात पाय फसतात, अशी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती उमरेड तालुक्यातील कऱ्हांडला ते वानोडा या पणंद रस्त्याची झाली आहे. चार किमीचा हा पाणंद रस्ता जीवघेणा झाला असून, ‘सर्जा-राजा’चे अतोनात हाल होत आहेत.
शेतकऱ्यांच्या साेबतीने शेतीत घाम गाळणाऱ्या आणि राबणाऱ्या ‘सर्जा-राजा’च्या जोडीचा हा जीवघेणा प्रवास आम्हाला रोजचाच करावा लागत आहे. पाणंद रस्त्याची ही दुर्दशा चांगलीच त्रासदायक ठरत असून, चिखलातून वाट काढायची तरी कशी, असा संतापजनक सवाल शेतकरी करीत आहेत.
देशभरात नाव मोठे करणाऱ्या उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्याला खेटून असलेला हा मार्ग मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी खडतर ठरत आहे. बैलगाडी असो, सायकल, दुचाकी वाहने तसेच माणसांनाही इकडून-तिकडे जाण्यासाठी सर्वांचीच वाट लागते.
सध्या पाऊसधारा बरसत आहेत. शेतात सोयाबीन, कपाशी, धान, मिरची, भाजीपाला आदी पिके सर्वत्र आहेत. अशावेळी दररोज शेतीची वाट धरावी लागते. अशातच पाऊस पडला की, मार्ग चिखलमय होतो. गुडघाभर चिखल तुडवीत या पाणंद रस्त्याचा खडतर आणि जीवघेणा प्रवास करावा लागतो. बैलांचे हाल-बेहाल होतात. मागील अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे ही समस्या शेतकऱ्यांनी मांडली. अनेकदा मातीकाम, खडीकरण तसेच डांबरीकरण करून द्यावे, असे निवेदनही शेतकऱ्यांनी सोपविले. मात्र कवडीचाही फायदा झाला नाही. समस्या ‘जैसे थे’ असून या गंभीर समस्येकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जात असल्याचा संताप शेतकरी व्यक्त करीत आहेत. आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
....
शंभरावर शेतकऱ्यांना फटका
दिवस-रात्र घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांना या अतिशय खराब पाणंद रस्त्यामुळे पिकांची योग्य नीगा राखण्यास अडचण निर्माण होत असल्याने दरवर्षी परिसरातील शंभरावर शेतकऱ्यांना याचा फटका बसतो. प्रचंड नुकसान सोसावे लागते. तातडीने या समस्येची दखल घ्यावी आणि मार्गाची दुरुस्ती तसेच खडीकरण करण्यात यावे, अशी मागणी वानोडा, कऱ्हांडला येथील शेतकरी, शेतमजुरांनी केली आहे.