लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा व सत्र न्यायालयातील एक लिफ्ट मंगळवारी पुन्हा जीवावर उठली होती. लिफ्ट मध्येच बंद पडल्यामुळे त्यात तीन वकील व तीन अन्य व्यक्ती असे एकूण सहाजण सुमारे पाऊणतास अडकले होते. त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू देणे शक्य झाल्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु, या घटनेमुळे लिफ्ट देखभालीची जबाबदारी असलेल्या प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणखी एकदा चव्हाट्यावर आला.आठ माळ्याच्या जिल्हा न्यायालयात न्यायाधीश, वकील व पक्षकारांच्या सुविधेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी लिफ्ट लावण्यात आल्या आहेत. दुपारी २ च्या सुमारास सहाजण पश्चिम भागाकडील लिफ्टमध्ये गेले होते. त्यांना वेगवेगळ्या माळ्यावर जायचे होते. दरम्यान, लिफ्ट पाचव्या माळ्यावर पोहोचण्यापूर्वी बंद पडली. त्यामुळे लिफ्टमधील व्यक्तींनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकू न परिसरातील वकील, न्यायालयीन कर्मचारी आदी धावत लिफ्टजवळ गेले. जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अॅड. कमल सतुजा व इतर पदाधिकारीही त्या ठिकाणी पोहचले. मदतीकरिता तंत्रज्ञाला फोन करण्यात आला. परंतु, तंत्रज्ञांना घटनास्थळी पोहचण्यासाठी सुमारे अर्धा तास लागला. त्यानंतर त्यांनी काही वेळातच लिफ्ट वर आणून त्यातील व्यक्तींना बाहेर काढले. तेव्हापर्यंत अॅड. सतुजा व इतरांनी लिफ्टमधील व्यक्तींसाठी पाणी, ज्युस व बिस्किटची व्यवस्था केली. त्यांना वारा मिळण्यासाठी जागा करण्यात आली. सतत संवाद साधून त्यांना धीर देण्यात आला. त्यामुळे घटनेने गंभीर स्वरूप धारण केले नाही. लिफ्टमधील व्यक्तींची लगेच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पूर्व सावधानी म्हणून रुग्णवाहिकाही न्यायालयात बोलावण्यात आली होती.विषय लावून धरणारलिफ्ट मध्येच बंद पडणे ही अतिशय गंभीर घटना आहे. अशा घटना जिल्हा न्यायालयात वारंवार घडत असल्यामुळे प्रशासनाने लिफ्टस्ची नियमित देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच, लिफ्टस्ची सखोल तपासणी करून त्रुटी दूर केल्या गेल्या पाहिजे. अशा घटनामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा विधिज्ञ संघटना हा विषय लावून धरणार आहे. यासंदर्भात उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय प्रशासनाशी चर्चा करून आवश्यक कारवाई करण्याची विनंती केली जाईल.अॅड. कमल सतुजा, अध्यक्ष, डीबीए.ही वर्षातील दुसरी घटनाही या वर्षातील दुसरी घटना होय. गेल्या ११ जून रोजी दुपारी ३ च्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर एक लिफ्ट बंद पडली होती. त्यात ११ व्यक्ती अडकले होते. असह्य उकाडा व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्या सर्वांचा जीव घाबरला होता. त्यातील शाहीन शहा, आफरीन अझमत व सुधा सहारे या तीन महिला वकील बेशुद्ध झाल्या होत्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे करण्यात आलेल्या तपासात लिफ्टमधील ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाईस योग्य पद्धतीने कार्य करीत नसल्याचे आढळून आले होते.वकिलांच्या प्रतिक्रियातातडीने उपाय करावेतजिल्हा न्यायालयातील लिफ्ट वारंवार खराब होतात. त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे.अॅड. लुबेश मेश्राम.कारवाई व्हावीलिफ्ट मध्येच बंद पडणे फार धोकादायक आहे. त्यात जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी.अॅड. समीर सोनवणे.तंत्रज्ञ हजर असावेतलिफ्टमध्ये कधीही तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता असते. अशावेळी तातडीने उपाय करता यावे याकरिता तंत्रज्ञ न्यायालयातच हजर पाहिजे.अॅड. ए. व्ही. बंड.
नागपूरच्या जिल्हा न्यायालयातील लिफ्ट पुन्हा जीवावर उठली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 9:12 PM
जिल्हा व सत्र न्यायालयातील एक लिफ्ट मंगळवारी पुन्हा जीवावर उठली होती. लिफ्ट मध्येच बंद पडल्यामुळे त्यात तीन वकील व तीन अन्य व्यक्ती असे एकूण सहाजण सुमारे पाऊणतास अडकले होते.
ठळक मुद्देसहाजण थोडक्यात बचावले : प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर