नागपूर : इतिहासात आतापर्यंत भारतमातेला २४ वेळा खंडित करण्याचे पाप झाले आहे. हे देशवासीयांनी विसरून चालणार नाही; ज्या-ज्या वेळी या देशावर आक्रमणे झालीत, त्या-त्या वेळी या देशातील युवकांनी प्राणपणाने या देशासाठी आपली आहुती दिल्याचा आपला तेजस्वी इतिहास आहे. त्यामुळेच आम्हा युवकांच्या धर्म निष्ठेने, ध्येयाने व प्रयत्नांतील सातत्याने अखंड भारताचे स्वप्न साकार होईल व ते केल्याशिवाय या देशातील युवक स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन युवा वक्ते ऋग्वेद मदन सेनाड यांनी केले आहे.
अखंड भारत संकल्प दिनाच्या पर्वावर आयोजित जाहीर सभेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
स्वतंत्रता अमृत महोत्सव समितीतर्फे झिंगाबाई टाकळी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंकरराव वानखेडे, अल्केश येरखेडे व मनोज सिंह मंचावर उपस्थित होते.
सेनाड म्हणाले, अखंड भारत हे देशातील कोट्यवधी नागरिकांचे स्वप्न असून, ते साकार करण्यासाठी युवकांच्या मनात राष्ट्रभक्ती व धर्माभिमान जागवणे आवश्यक आहे. आजची भरकटत चाललेली युवा पिढी व आपल्या संस्कृतीशी होत चाललेली फारकत हे देशासमोरचे सगळ्यात मोठे आव्हान आहे. प्रास्ताविक मनोज सिंह यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन प्रणव मालवीय यांनी केले. सभेपूर्वी अखंड भारत युवक रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सभेनंतर अखंड भारत साकार करण्याचा संकल्प करण्यात आला व सामूहिक वंदेमातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी कमलेश डोंगरे, रूपेश सोनटक्के, पवन चरडे, रत्नाकर ठाकरे, अभिजित टेकाडे आदींनी परिश्रम केले.