नागपूर : शहरात सोमवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. सकाळी हलका पाऊसही झाला. आकाश ढगाळलेले होते, मात्र जोराचा पाऊस आला नाही.
ढगाळलेल्या वातावरणामुळे सोमवारी दिवसभराच्या तापमानात मागील २४ तासात ३ अंश सेल्सिअसने घट झाली. ३३.३ अंश तापमान नोंदविण्यात आले. दिवसभर वारा मात्र वेगाने वाहत होता. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व मध्य प्रदेश व आसपासच्या क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम नागपूरसह विदर्भातील अन्य जिल्ह्यावर झाला आहे. याामुळे वातावरण ढगाळलेले आहे. वाशिम जिल्ह्यात १५ मिमी, अमरावतीमध्ये ४ तर अकोल्यामध्ये ०.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. नागपुरात येत्या २४ मार्चपर्यंत आकाशात ढग दाटलेले राहतील. काही ठिकाणी हलका पाऊस येण्याची शक्यता आहे. आर्द्रतेचा स्तर ६० ते ७० टक्के राहील. ढगामुळे तापमान कमी होण्याची शक्यता आहे.